अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर होताच महायुती मधील पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच बसला आहे.
नुकत्याच आलेल्या अनुराधा नागवडेंनी अजित पवार गटाला राम राम ठोकत बुधवार दि. २३ रोजी मुबंईतील मातोश्रीवर जात शिवसेना ( उद्धव ठाकरे गटात ) प्रवेश केला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, उपनेते साजण पाचपुते, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांच्यासह कार्यकर्त्य उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये नागवडे कुटुंब हे एक राजकीय वर्चस्व असलेलं कुटुंब मानले जाते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र महायुती मधून श्रीगोंदाची जागा ही भारतीय जनता पक्षाला दिली गेल्याने अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नुकतेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मते आजमावली होती. यामधून कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी केली पाहिजे आणि निवडणूक लढवली पाहिजे असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता.