अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
युवकाच्या अपहरण व खून प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गंभीर दखल घेत, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारीला संदेश वाळुंज याचे तर २२ फेब्रुवारीला वैभव नायकोडी याचे अपहरण करण्यात आले. दोघांनाही एकाच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. मारहाणीत वैभव नायकोडी याचा मृत्यू झाला आहे. मात्र, अपहरण झाल्याची, त्यांना कोठे डांबले आहे, याची माहिती एका पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती, अशी चर्चा सध्या पोलिस वर्तुळात सुरु आहे.
तोफखाना पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याची गंभीर दखल घेत, चौकशीचे आदेश दिले आहेत. उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे. या संदर्भात उपअधीक्षक भारती यांना विचारले असता, चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.