सारीपाट / शिवाजी शिर्के
वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक ते आमदार आणि पुढे राज्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी आली. वसुबारसेच्या निमित्ताने गाय- वासराची पुजा करण्याचा दिवस! नेमके याच दिवशी दूधवाला आमदार म्हणून राज्यभर ओळख निर्माण झालेल्या शिवाजीरावांनी एक्झिट घेतली! त्यातही एकादशीचा दिवस! जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेल्या शिवाजीरावांनी 2019 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता सहावेळा विधानसभा गाठली. विखे पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्षात शिवाजीराव कधी थोरातांच्या बाजूने गेले तर कधी विखेंच्या बाजूने! मात्र, त्यांची भूमिका जिल्हा बँकेसह जिल्हा परिषदेमधील सत्तेची गणिते मांडताना निर्णायक ठरली. विखे आणि थोरात या दोन्ही दिग्गज नेत्यांना कर्डिले यांनी अनेकदा कोंडीत पकडले! जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेताना तिसरी शक्ती म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची ओळख निर्माण झाली आणि ती कायम राहिली. जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदयराव शेळके यांचे अकाली निधन झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदी पवार समर्थक संचालकाची वर्णी निश्चित असताना शेवटच्या क्षणी शिवाजीरावांनी डाव टाकला आणि विखे पाटलांची साथ घेत बँकेेचे अध्यक्षपद स्वत:कडे खेचून आणले.
दादापाटील शेळके हे खासदार झाल्यानंतर नगर- नेवासा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात दादापाटलांनी विजया कुटे यांना उमेदवारी मिळवून दिली. महिलेला उमेदवारी देऊन या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्याचा दादापाटलांचा डाव होता. विजया कुटे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे देखील आग्रही राहिले. मात्र, त्यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील बहुतांश दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र केले आणि पाटलांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले. राजदूत आणि यझडी या दुचाक्यांचा ताफा, त्यावर दूध उत्पादकच प्रचारकर्ते झाले. शिवाजीरावांनी पायाला भिंगरी बांधल्यागत प्रचाराची यंत्रणा राबवली आणि विजया कुटे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
दूधाचे कॅन गाडीवर बांधून गांधी मैदानात उभे राहून दूध विकणारे शिवाजीराव थेट विधीमंडळात आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांचा गांधी मैदानात दूध उत्पादकांनी जाहीर नागरी सत्कार केला होता. त्या पहिल्या निवडणुकीत ते अपक्ष होते. पुढे अपक्षांच्या मदतीवर राज्यात सरकार स्थापन करण्याची वेळ आली. त्यानंतर शिवाजीरावांना राज्यमंत्री पद मिळाले. काही काळ त्यांना नगरचे पालकमंत्रीपद देखील मिळाले. पुढे ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमले आणि पुन्हा भाजपामध्ये आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गोटातील आमदार म्हणून त्यांनी आपले स्थान पक्के केले आणि हेच स्थान शेवटपर्यंत कायम राहिले.
विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांचा हक्काचा नगर तालुका राहुरी, पारनेर आणि श्रीगोंदा या तीन तालुक्यात विभागला गेला. त्यांनी राहुरीची निवड केली आणि तेथून सलग निवडून देखील आले. मात्र, श्रीगोंदा आणि पारनेर येथील आमदार ठरविण्यात त्यांची भूमिका ही कायम निर्णायक ठरली. राहुरी मतदारसंघातून संधी मिळाल्यानंतर राहुरी कारखान्यात त्यांनी लक्ष घातले. जोडीने शेजारच्या श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथड, कर्जत- जामखेडमध्येही त्यांनी आपला संपर्क कायम ठेवला. शिड मतदारसंघाची काही गावे राहुरीच्या लगत असल्याने त्या गावांमधील राजकीय गणिते देखील शिवाजीरावांनी अनेकदा बदलवली. त्यामुळेच कर्डिले यांचा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये कायम दबदबा राहिला.
जिल्ह्यात सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण जास्त चालते आणि त्यातून त्यांच्या सोयीची राजकीय गणिते घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीरावांनी कोतकर- जगताप यांच्याशी सोयरीक केली. पुढे जाऊन कोतकर- जगताप या दोन व्याह्यांना सोबत घेत नगर शहराच्या राजकारणातही कर्डिले यांनी पाय रोवले. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांच्या विरोधात शिवाजीरावांनी कधी भानुदास कोतकर यांना तर कधी अरुणकाका जगताप यांना साथ दिली. जिल्ह्याचे मुख्यालय राहिलेल्या नगर शहरात शिवाजीरावांनी आपले राजकीय कसब अनेकदा पनाला लावले आणि ते सिद्ध देखील करुन दाखवले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या पराभवासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी देखील सभा घेतली. मात्र, शिवाजीरावांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर मात केली. जिल्हा बँक, जिल्हा परिषद या सत्तास्थानांच्या जोडीने सहकारातील राहुरी कारखान्यात अनेक बाका प्रसंग आले. मात्र, शिवाजीरावांनी त्यावर लिलया मात केली.
मणक्याच्या आजाराचे निमित्त झाले आणि त्यातून त्यांना उपचार घ्यावे लागले. त्याआधी व्याही असणाऱ्या अरुणकाकांच्या निधनाचा धक्का त्यांना पचवावा लागला. सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास खडतर वाटेने जाणाराच राहिला. मात्र, त्यांनी हार कधीच मानली नाही. दांडगा जनसंपर्क असणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये शिवाजीरावांनी स्थान निर्माण केले आणि ते स्थान त्यांनी टिकवून ठेवले. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याची मोठी हानी नक्कीच झाली आहे. त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्यावर हा मोठा आघात आहे. या धक्क्यातून सावरण्याचं बळ त्यांना नक्कीच मिळेल! कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. जावई असणारे माजी महापौर संदीप कोतकर आणि आमदार संग्रामभैय्या जगताप यांची साथ सोबत असेलच! शिवाजीरावांच्या अकाली निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरलीय! दूधवाला सरपंच ते राज्यमंत्री, जिल्हा बँकेचा अध्यक्ष असा प्रवास करताना जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा एक लढवय्या नेता आपण गमावला हे नक्की! त्यांना ‘नगर सह्याद्री’ आणि ‘न्यूज 24 सह्याद्री परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
चटका लावणारी एक्झिट: राठोड, गांधी, जगताप आणि आता कर्डिले!
नगर शहराच्या राजकारणाचा विचार केला तर पावभाजीची गाडी चालवरे दिलीप गांधी यांनी केंद्रात राज्यमंत्री मिळवले. पुढे त्यांची देखील अकाली एक्झिट झाली. अनिलभैय्या राठोड हे सामान्य नगरकरांना कायम आधार वाटले. रात्री- अपरात्री अनिलभैय्या त्यांच्या ओमनी व्हॅनमधून कोणाच्याही मदतीला धावायचे. त्यांची देखील आजारपणात एक्झिट झाली. आमदार अरुणकाका यांचे शहरासाठी योगदान मोठे राहिले. कार्यकर्त्यांचा मोठा संच आणि शहराच्या विकासाचे भान जपणारा हा नेता अल्पशा आजाराचा बळी ठरला. या तीन नेत्यांच्या पाठोपाठ आता शिवाजीरावांची एक्झिट नगरकरांच्या मनाला हुरहुर लावणारी ठरलीय. खरेतर या चौघांनीही एकमेकांच्या विरोधात कधीकाळी संघर्ष केला. राठोड- गांधी यांच्यात हिंदुत्वाची विचारधारा एक असतानाही पटले नाही. जगताप- कर्डिले यांच्यात नातेसंबंधांनगर मनोमिलन झाले आणि ते शेवटपर्यंत राहिले. आता या चौघांच्याही कुटुंबातील दुसरी युवा फळी काम करत आहे. त्यातील संग्राम जगताप यांनी सलग तिनदा आमदारकी जिंकली. राठोड- गांधी यांचे चिरंजीव राजकीय अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत. त्यात आता शिवाजीरावांचे चिरंजीव अक्षय कर्डिले पुढे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
जिल्हा बँकेने गमावला दुसरा अध्यक्ष!
जिल्हा सहकारी बँकेच्या पाच वर्षापूव झालेल्या निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. उदयराव गुलाबराव शेळके यांची निवड करण्यात आली होती. ॲड. शेळके यांचे आजारपणात निधन झाले. त्यानंतर अध्यक्षपदी आ. शिवाजीराव कर्डिले यांची निवड करण्यात आली. त्यांची कारकिर्द संपण्यास काही महिने बाकी असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पाच वर्षांच्या संचालक मंडळाच्या कारकिदत बँकेचे दोन्ही अध्यक्ष निधन पावले.