अहिल्यानगर | नगर सह्याद्री
छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने ठेकेदारांकडून कामगारांच्या माथाडी मंडळास प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील कामगारांना उपलब्ध करून देणे, ठेकेदारांकडून 100 टक्के थकीत रक्कम तहसील कार्यालयाच्या वतीने आरआरसी अंतर्गत वसूल करून कामगारांच्या खात्यावर जमा करणे, कामगारांचे मंडळाकडे जमा असलेले थकीत वेतन तात्काळ अदा करणे या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिक, कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. शहरप्रमुख म्हणून पदभार स्वीकारताच किरण काळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. यावेळी काळे यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कामगार नेते विलास उबाळे, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. श्रीकांत चेमटे, रेवजी नांगरे, किरण बोरुडे, महावीर मुथा, उषाताई भगत, शैलाताई लांडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, मनोज चव्हाण, विनोद दिवटे, नीलेश सोनवणे, संतोष पोळ, संतोष सुसलादे, सुमित पळसे, अंगद महारनवर, गोरख पुलावळे, विशाल केदारे, गणेश बनसोडे आदींसह अन्य शिवसैनिक, कामगार या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी किरण काळे म्हणाले की, कामगार त्यांच्या हक्क़ाचे दाम मागत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत आहे. शिवसेनाही कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायला तयार आहे. प्रशासनाने दिशाभूल करणे थांबवावे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न माग लावावेत, अन्यथा भविष्यात शिवसेना स्टाईल धडा शिकवावा लागेल. कामगार नेते विलास उबाळे म्हणाले की, डिसेंबर महिन्यापासून आम्ही सातत्याने लेखी पाठपुरावा कामगार मंडळाकडे करत आहोत. तरी देखील मंडळ दखल घेत नव्हते. म्हणून ठिय्या आंदोलन छेडावे लागले. प्रशासनाने आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळावा. अन्यथा शिवसेना कामगार आघाडी तीव्र आंदोलन छेडेल. या मागण्यांवर आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन सहायक कामगार आयुक्तांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.