अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून अहिल्यानगरच्या राहाता शहरातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि शहर समन्वयक भागवत लांडगे यांना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले. जिल्ह्यातील ठाकरे सेना ही कोल्हे – थोरातसेना झाली असल्याचा आरोप पठारे यांनी केला असून आम्ही निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे स्थानिक आघाडी स्थापन करून राहाता नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक पक्षांच्या चिन्हांवर लढवली जावी असा आग्रह माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि त्यांच्या समर्थकांचा होता. त्यामुळे पठारे यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली करत पक्षाचा एबी फॉर्म मिळवला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे.
या कारवाईमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील ठाकरेसेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप असून ही ठाकरेसेना नाही तर केटी सेना अर्थात कोल्हे – थोरात सेना झाल्याचा घणाघात राजेंद्र पठारे यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी विखे समर्थकांनी माझे घर जाळले, आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र पक्ष सोडला नाही. बाळासाहेब थोरात कृषिमंत्री असताना आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांच्या घरावर कांदे फेकले होते, त्याचा बदला ते आता घेत आहेत. निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य असून जिल्ह्यातील उद्धव साहेबांचा पक्ष संपवण्याचा थोरातांचा डाव असल्याचा आरोप पठारे यांनी केला आहे.



