अहिल्यानगर | नगर सह्याद्री
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांसह विविध संघटना व तरुण मंडळांनी या शिवजयंती उत्सवात उत्साहाने भाग घेतला. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शहरात सहा, सावेडी उपनगरात एक अशा सात संघटनांनी मिरवणूक काढली.
छत्रपती शिवरायांची जयंती नगर शहरात तिथीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध चौकांमध्ये सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी ध्वनिवर्धकावर महाराजांवरील पोवाडे लावण्यात आले होते. शहरातील माळीवाडा, कापडबाजार, चितळेरोड, दिल्ली गेट, नवीपेठ, सर्जेपुरा, सावेडी उपनगर, पाइपलाइन रोड आदी ठिकाणी विविध मंडळांनी शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. शहरातून मिरवणुकाही काढण्यात आल्या. मिरवणुकांत झांजपथके, लेझिम पथके, बँडपथके आदींचा समावेश होता. मिरवणुकीत गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. पोलिस प्रशासनाच्या वतीने ४६ अधिकारी व ३५० कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.