अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील राज्यात प्रसिद्ध असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. तीन वेगवेगळ्या भागात तिघांवर धारदार शास्राने प्राणघातक हल्ले करण्यात आले. यात साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
अधिक माहिती अशी: सोमवार दि.०३ फ्रेबुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान साई संस्थानचे कर्मचारी सुभाष घोडे ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला.
मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या तिन्ही घटनांमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली असून दुहेरी हत्याकांडाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं बघायला मिळत आहे. त्याचीच परिणीती समोर आली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शिर्डीत दाखल झाले असून तपास सुरु आहे.