Maharashtra Politics News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे गटातील शिवसेनेत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदेसाहेब, आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल, तर तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा! असे सणसणीत प्रत्युत्तर देत दराडे यांनी पक्षनेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून, पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हा वाद अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांच्या चार महिन्यांपूर्वीच्या शिंदे गटातील प्रवेशाने सुरू झाला. मेंगाळ यांनी पक्षप्रवेशादरम्यान बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता. यावेळी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दराडे यांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्यातील नाराजी वाढली. गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता.
९ ऑगस्ट रोजी अकोले येथे आयोजित आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मारुती मेंगाळ यांनी मंचावरून थेट मागणी केली की, “एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला ठेवा!” यावर शिंदे यांनी, “शिवसेना ही मालक आणि नोकराची नाही, तर कार्यकर्त्यांची आहे. मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आणि करत आहे. जो पक्षासाठी काम करेल, तो पुढे जाईल; आणि जो खोडा घालेल, त्याला बाजूला केलं जाईल,” असा इशारा देत दराडे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे यांच्या या इशाऱ्याला २४ तासांच्या आत बाजीराव दराडे यांनी राजीनामा देऊन प्रत्युत्तर दिलं. “मी पक्षात एकनाथ शिंदे यांच्यासाठी नाही, तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी काम केलं. माझ्याच तालुक्यात येऊन माझी शक्ती कमी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर पक्षात राहण्याचा प्रश्नच नाही. मी संघर्षातून पुढे आलो आहे, पक्षामुळे नाही, असं म्हणत दराडे यांनी शिंदे यांना खडेबोल सुनावले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.