पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील पाडळी आळे शिवारात रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला करून १० छोट्या-मोठ्या बकऱ्या ठार केल्या. या घटनेत वनकुटे येथील मेंढपाळ संतोष महादू तांबे यांचे सुमारे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धांडे, वनपाल साहेबराव भालेकर आणि वनरक्षक अंकराज जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनी शासनाला अहवाल पाठवून तांबे यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पारनेर, सुपा, चिंचोली, पाडळी आळे, कळस आणि खडकवाडी परिसरात बिबट्याने कुटुंबासह तळ ठोकला असून, त्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. खडकवाडी, कळस आणि पारनेर या गावांमध्ये बिबट्याने मानवावर हल्ले करून जीवितहानी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी वनविभागाकडे गावोगावी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.
संतोष तांबे हे मेंढ्या चारण्यासाठी पाडळी आळे येथे आले होते. रविवारी सायंकाळी बिबट्याने वाघुरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला, ज्यामुळे १० बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. याच दिवशी पारनेर शहरातील सेनापती बापट विद्यालयात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याला ओढत नेले, तसेच चिंचोली घाटात गायीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांचा वाढता उपद्रव यामुळे वनविभाग आणि ग्रामस्थांसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाने याप्रकरणी त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुपा शहरात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी जिजाबा गवळी वस्ती येथे एक बिबट्या पकडण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) पहाटे पुन्हा एक बिबट्या शितारा बिल्डिंगच्या मागील भागात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. दोन बिबट्यांच्या जेरबंद कारवाईनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी परिसरात आणखी एक बिबट्या आणि दोन पिल्ले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिक अजूनही चिंतेत आहेत.
तातडीने बंदोबस्त करा: ग्रामस्थांची मागणी
पारनेर तालुक्यातील कळस, पाडळी आळे, रानमळा, बेल्हे आणि पंचक्रोशी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी जनतेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात जनावरेच नव्हे तर निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाच्या उदासीन धोरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निर्मलग्राम कळसचे सरपंच मेजर राहुल गाडगे आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे यांनी वनविभाग व प्रशासनाला निवेदन पाठवत तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.



