अकोला | नगर सह्याद्री
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहारामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आले आहेत. काँग्रेसमधील विविध नेत्यांकडून या प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांनाही लक्ष्य केलं जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्िप्रया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला होता. आता अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली असून थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.
शरद पवार यांनी म्हटलं की, पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण गंभीर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एखादी गोष्ट गंभीर असल्याचं मुख्यमंत्री सांगत असतील तर त्याबाबत चौकशी करून वास्तव चित्र त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काम त्यांनी करावं, अशी आमची अपेक्षा आहे, असं पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.तसेच मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे निर्णय घेतला असेल, असेही शरद पवार यांनी म्हटले.
यावेळी शरद पवार यांना शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर पवार यांनी म्हटले की, कोण तेजवानी, आणखी कोण, यांची नावं मला माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच हे सगळं शोधून काढावे, असेही शरद पवार यांनी म्हटले.दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याबद्दल पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र प्रशासन, राजकारण, कुटुंब आणि कुटुंबप्रमुख या गोष्टींमध्ये फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून म्हणाल तर आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत. माझा एक नातू हा अजित पवारांविरोधात उभा होता. अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात निवडणुकीत उभी होती, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.



