विधानसभेपूर्वी १६० जागांची ‘त्या’ दोघांनी गॅरेंटी दिलेली
नागपूर / नगर सह्याद्री :
विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती. त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती. त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको, असे आम्ही ठरवलं, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर आता शरद पवार यांनी हा गौप्य स्फोट केला आहे. शरद पवार यांच्या गोप्यस्फोटानंतर ती दोन माणसं कोण होती? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची युती आणि राहुल गांधींच्या आरोपावर भाष्य केले. राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेणारे आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो. राहुल गांधींच्या आरोपाला आयोगाने उत्तर द्यावे, असे यावेळी शरद पवार म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर बोलताना पवार म्हणाले की यावर आता ठोस बोलताना येणार नाही, आम्ही चर्चा करू
आम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन माणंस माझ्याकड आली होती. महाराष्ट्रामध्ये २८८ जागा आहेत, त्यांनी १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल शंका येत आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. मी तिथं होतो, ज्यावेळी प्रेझेंटेशन बघत होतो, यावेळी उद्धव ठाकरे सोबत होते. एक गावात, घरात एक व्यक्ती राहत असताना 40 लोकांनी मतदान केले असे अनेक उदाहरण आहेत. निवडणूक आयोगाने लक्ष स्वतंत्र संस्था आहे, यात सखोल जाण्याची गरज आहे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवरांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “मला लक्षात येत नाही की इतक्या दिवसांनंतरच शरद पवारांना राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कहान्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोकल्पित कहान्या सांगत आहेत, तशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना?” “अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएमबद्दल होते तरी शरद पवार बोलत नव्हते, किंबहुना शरद पवारांनी अनेक वेळा स्पष्टपणे भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं आयोग्य आहे. आणि आता अचानक शरद पवार जे बोललेत, राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय,” असेही फडणवीस म्हणाले.
संभ्रम निर्माण केला जात आहे का?
महापालिका निवडणनुकीच्या तोंडावर विरोधकांकडून मतदार याद्या आणि मदतान प्रक्रिया याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कितीही संभ्रम निर्माण केला तरीही भारताएवढे ‘फ्री अँड फेअर’ निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. हे सगळे बोलतायत, पण निवडणुक आयोगाने बोलवल्यावर हे कोणी जात नाहीत, निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतलीय, तर चालेल का? तसंच कायदेशीर प्रकरणात जर तुम्हाला शपथपत्र मागीतलं जातंय तर तुम्ही का देत नाहीत? कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खोटं बोलत आहात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई हऊ शकते. म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोकं आहेत.”
नेमकं काय म्हणाले दानवे?
विधानसभा निवडणुकीला आता जवळपास सहा महिने पूर्ण होऊन गेले. या निवडणुकीचा जो निकाल लागला तो अजूनही महाविकास आघाडीच्या पचनी पडत नाही. पहिला आरोप ईव्हीएमवर केला, दुसरा आरोप मतदार यादीवर, तिसरा आरोप केला की शेवटच्या टप्प्यात मतदार कसे वाढले. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत. आजचा हा जो चौथा आरोप आहे, शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेत्याबद्दल आम्ही कधी बोलत नाही परंतु, मला असं वाटतं की हे जे दोन अधिकारी होते, त्या सर्वांच्या घरात कॅमेरे आहेत, एकदा जनतेसमोर ते दोन अधिकारी कोण आहे ते त्यांनी आणून दाखवावेत, असं थेट आव्हानच दावने यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की रोज काही ना काही तरी आरोप करतात, विधानसभेचा निकाल त्यांच्या पचनी पडत नाहीये, आज संपूर्ण जनतेचे लक्ष महाराष्ट्राच्या विकासाकडे आहे. आणि ते लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप करत आहेत.
निवडणूक काळामध्ये अनेक सर्वे एजन्सी येत असतात, तुम्ही आम्हाला सर्वे द्या, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देतो. आमच्याकडे ते आले होते, वैयक्तिकरित्या ते उमेदवाराकडे सुद्धा जातात की मी तुम्हाला जिंकून देतो म्हणून. त्यामुळे शंभर टक्के हे सर्वे करणारे लोक असू शकतात असंही यावेळी रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे लोकसभेला सुद्धा आले आणि विधानसभेला सुद्धा ते आले होते. एजन्सीला हे जर अधिकारी म्हणत असतील आणि त्याच्या आडून जर सरकारवर निशाणा साधत असतील तर, त्यांनी खुलासा करावा की ते दोन अधिकारी कोण आहेत, असं आव्हान रावसाहेब दानवे यांनी यावेळी शरद पवार यांना केलं आहे. शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबुडाचा आहे. तथ्यहीन आहे, या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे सगळे अधिकारी नसून सर्वे एजन्सी वाले लोक आहेत, असे प्रत्युत्तर रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना यावेळी दिलं आहे.