शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री:-
लोकसभा निवडणुकीत प्रचंड स्ट्राईक रेट मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. पवार गटाच्या आठपैकी पाच खासदारांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत वृत्त आहे. 12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्याच रात्री बंडाचे निशाण हाती घेत पाच खासदार स्वतंत्र गटाद्वारे भाजपाला पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षातील कारणे वेगळीच असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मतदारांचा विश्वासघात होत असल्याने त्यांच्या या पक्षांतराने राज्यात संतापाची लाट उसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी की, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, असे असतानाही देशात भाजपाची सत्ता आली. त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल असे वाटत असताना प्रत्यक्षात स्पष्ट बहुमताने राज्यात महायुतीचीच सत्ता पुन्हा आली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली असताना उपमुख्यमंत्री पदी अजित पवार आणि शिंदे गटाला संधी मिळाली.
केंद्रात आणि राज्यात महायुतीची आलेली स्पष्ट बहुमताची सत्ता पाहता विरोधात निवडून आलेल्या खासदारांसह आमदारांच्याही मनात विकास कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अर्थात हे वरकरणी दाखवले जात असले तरी निवडणुकीसाठी केलेला अमाप खर्च, त्यासाठी काहींनी ठेकेदारांकडून घेतलेल्या रकमा आणि त्याचा परतावा द्यायचा असेल तर त्या ठेकेदारांना कामे द्यावी लागतील. मात्र, सत्ता नसल्याने ते शक्य नाही. मग, सत्तेत गेलो तर देणेदारीचा विषय आपोआप माग लागेल अशी भूमिका काहींनी घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचा हा निर्णय पाच खासदारांनी घेतल्याचे मानले जात आहे. आता यावर शरद पवार गटाकडून काही डागडुजी होते किंवा कसे हे पहावे लागणार आहे.
खा. निलेश लंके यांची हीच ती गुड न्यूज?
खासदारकी मिळाल्याने आपली पत्नी विधानसभा निवडणुकीत सहज विजयी होईल असे वाटत असलेल्या नीलेश लंके यांना पारनेरच्या मतदारांनी स्पष्ट नाकारले. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे निलेश लंके हे स्वत: प्रस्थापित होत असल्याचे पाहून पारनेरच्या सुज्ञ मतदारांनी सुप्त लाट निर्माण केली आणि त्यातून काशिनाथ दाते यांचा पर्याय निवडला गेला. यानंतर कार्यकर्त्यांच्या सुपा येथे झालेल्या बैठकीत बोलताना खा. लंके यांनी, ‘एष महिन्यात गुडन्युज देतो’, असे भाकीत वर्तवले होते. त्याचवेळी लंके हे बंडाचे निशाण हाती घेतील अशी अटकळ बांधली गेली होती. पवारांना गुडबाय करत भाजपा अथवा अजित पवार गटात शरद पवार यांचे काही खासदार दाखल होत असल्याचे पाहत निलेश लंके यांनी त्या मेळाव्यात जाहीर केलेली हीच ती गुडन्यूज असल्याची पुष्टी यानिमित्ताने मिळत आहे.
13 डिसेंबरची विमानाची तिकीटे केली बुक!
खा. लंके यांच्या कार्यालयातून त्यांच्या अत्यंत विश्वासू यंत्रणेने मतदारसंघातील जवळपास 25 निवडक सहकाऱ्यांची (कोअर टीम) दि. 13 डिसेंबर रोजीची विमानाची तिकीटे बुक केली आहेत. नगर शहरातील तीघांना यासाठी आमंत्रीत करण्यात आले आहे. दिल्लीत यानिमित्ताने या कोअर कमिटीसोबत चर्चा होणार असल्याचेही बोलले जाते. विरोधात जास्त दिवस थांबून चालणार नाही, कामांसाठी आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही खासगी बैठक असल्याचे खा. लंके यांच्या कार्यालयातून या कोअर कमिटीतील सदस्यांना सांगण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
दिल्लीनंतर मुंबईत होणार बंड!
भाजपाच्या विरोधात मते मागणाऱ्यांना राष्ट्रवादीची तुतारी हाती देत मतदारांनी निवडले. मात्र, आता त्यांनी केंद्रात म्हणजेच दिल्लीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पाहता राज्यातील शरद पवार गटाचे आमदार देखील या निर्णयाप्रत आलेले दिसल्यास आश्चर्य वाटू नये.