गोंदिया / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते. 2014 मध्येच ठरलं होतं की, भाजपने शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा आणि सत्तेत यायचं, मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची आणि आमची खूप दिवसापासूनची भाजपसोबत यायची इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) यांची देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये बोलताना केला आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती, आणि आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो. तुम्ही पुढे निघून गेले असे म्हणत त्यांनी यावेळी मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील खोचक टोला लगावला आहे.
राहुल गांधींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप केला आणि त्याच्यानंतर बिहारमधून आज त्यांनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना निवडणुकीच्या 6 महिन्यानंतर जाग आली आणि ते वोट चोरीचा आरोप करत आहेत. निवडणूक होती तेव्हा असा कोणीही आरोप केला नाही. महाराष्ट्रामध्ये देखील एकाही पक्षाने त्यावेळी तक्रार केली नाही, की वोट वाढलेत म्हणून. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वोट चोरी आणि बूथ कॅप्चर होऊ शकत नाही, असं मी सांगू शकतो असं यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.