Sharad Pawar News: लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरद पवार सांगलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर केला. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित करत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील जनतेला रोहित पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले, आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा. येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू. रोहित पाटील यांनी नुकताच २५ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा होती.तसेच शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी काहीजणांच्या डोक्यात सत्ता गेली होती, डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या. सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना संधी दिली आणि आता ते लोकसभेत जाऊन बसले आहेत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर नरेंद्र मोदींनी सातत्याने टीका केली, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही असेही ते म्हणाले.