Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता राज्यातील सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपत आले आहे.
आता शेवटच्या टप्प्यातील जागा जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये माढा, पंढरपूर, अशा महत्त्वाच्या जागांचा पेच होता. हा पेच आता सुटला आहे. येथे शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत पंढरपूर, माढा या मतदारसंघांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार यांनी एकूण पाच जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या पाच जागांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत 87 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांची ही शेवटची यादी असू शकते. महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूरच्या जागेसाठी वाद चालू होता.
या जागेवर याआधीच काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यानंतर आता येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार का? असे विचारले जात आहे.
पाचव्या यादीत कोणत्या उमेदवाराला कुठून तिकीट?
माढा- अभिजीत पाटील
मुलुंड- संगिता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
पंढरपूर- अनिल सावंत
मोहोळ- राजू खरे