मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी पाच जागा जवळपास निश्चित झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बारामती, सातारा, रावेर, शिरुर, नगर दक्षिण या जागावर पवार गट लढवण्याची शक्यता आहे.
या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेरमधून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारामधून श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.
शरद पवार म्हणाले, जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न राहीलं. राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांना घेवून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. एक दोन जागांचा तिढा आहे, त्या पार्श्वभूमीनर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासांदर्भात विचार सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली.