अहिल्यानगर । नगर सहयाद्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना सादर केलेल्या पत्राव्दारे आपला राजीनामा दिला आहे.
आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी 2018 मध्ये जिल्हाध्यक्ष पदभार स्वीकारला होता. जवळपास सात वर्षे मी पक्ष संघटन बळकटीसाठी काम केले. आता नवीन चेहर्याला संधी देण्यासाठी तसेच वैयक्तिक कौटुंबिक कारणास्तव मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
फाळके यांनी 2018 पासून सातत्याने पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावली असून, त्यांनी विविध निवडणुकांमध्ये पक्षासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या बरोबर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे. राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.