मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली. १२ तास चौकशी सुरु होती. शरद पवार हेही १२ तास ईडी कार्यालयात होते.
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित होते. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडल्यावर आ.रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी, नाव न घेता अजित पवारांवरही टीका केली.
रोहित पवार यांना साथ देण्याकरिता स्वतः शरद पवार १२ तास ईडी कार्यालयात उपस्थित राहिले होते, असे राष्ट्रवादीने सोशल मीडियातून सांगितले. तर, ईडी कार्यालयातून बाहेर येताच रोहित पवारांनी शरद पवारांचां संदर्भ देत अजित पवारांवर निशाणा साधला. जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो.
त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा आपला लाडका नेते शरद पवार स्वत: आले. शरद पवार एखाद्याला युवकाला संधी देऊ शकतात. ते संधी देतातही. पण त्याचसोबत कार्यकर्ता अडचणीत असताना त्याच्या पाठिशी शरद पवार भक्कमपणे उभे राहतात. साहेब लढत असताना त्यांना लढणारी माणसं आवडतात. कारण मराठी माणसे लढत असतात.
त्यामुळे पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार कायम उभे राहतात. बापमाणूस म्हणून ते इथं होते. बापाला आम्ही बापच म्हणतो, त्यांचे वय काढत नाही. आपल्या सर्वांना वारसा विचारांचा आहे. पण मार्ग संघर्षाचा आहे अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी अजित पवार गटासह भाजपावर निशाणा साधला आहे.