शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त, डेप्युटी सीईओ नितीन शेटे यांनी राहत्या घरात घेतला गळफास
शनिशिंगणापूर | नगर सह्याद्री
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर राज्यात प्रसिद्ध असलेले शनिशिंगणापूर देवस्थान वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना व त्या घोटाळ्याची चौकशी चालू असतानाच या देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नितीन शेटे हे शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी होते. त्यांचा सोमवारी सकाळी राहत्या घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला.
दरम्यान, शेटे यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. त्यांनी आत्महत्या का केली? हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेचा सखोल तपास झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात.
रिमोर्ट कंट्रोल असणाऱ्या बड्या नेत्यानेच हात झटकले!
शनिशिंगणापूर देवस्थानमधील कोट्यवधींचा घोटाळा समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात एका बड्या नेत्याचे नाव आले. या देवस्थानवर त्या नेत्याचा रिमोट कंट्रोल होता. मात्र, घोटाळा उघड होताच या नेत्याने हात झटकले आणि या घोटाळ्याला त्या- त्या कालावधीतील विश्वस्त मंडळच जबाबदार असल्याची भूमिका घेतली. नेत्यानेच हात झटकल्याने आजी- माजी विश्वस्त मंडळ प्रचंड तणावात आले. यातूनच नितीन शेटे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले की आणखी काही हे तपासातच निष्पन्न होणार आहे.
शनिच्या दानावर डल्ला मारणारी टोळी!
नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी त्याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. महिनाभरापूव 114 मुस्लीम कर्मचारी घेतल्यामुळे शनि शिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तसेच देवस्थानाचे बनावट ॲप तयार करुन पैशांची अफरातफर झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारकडून शिड आणि पंढरपूरच्या धतवर शनिशिंगणापूर येथे मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.
लढवले जात आहेत तर्कवितर्क!
नितीन शेटे यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा काही संबंध असावा का, याविषयी सध्या तर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता पुढील पोलीस चौकशीत काय समोर येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आ. लंघे यांची लक्षवेधी अन् देवेंद्रजींकडून धक्का!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात ही माहिती दिली होती. आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आता या अहवालातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कटकारस्थानाचाच संशय बळावू लागला!
देवस्थानच्या कारभारात आणि आर्थिक व्यवहारात अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याचे काम नितीन शेटे यांनी केले होते. नितीन शेटे याचा जबाब नोंदविला गेला असता अथवा त्याने तोंड उघडले असते तर अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा देखील झाला असता. त्यामुळेच शेटे यांच्या या घटनेच्या मागे दबाव, धमक्या की काही मोठे कटकारस्थान आहे हे तपासाअंतीच उघड होईल. या घटनेनंतर स्थानिक राजकीय मंडळींनी मौन बाळगले आहे. शेटे यांच्या आत्महत्येचा संबंध कोणत्या बड्या नेत्यांशी आहे का याबाबत देखील उलटसुलट चर्चा झडू लागल्या आहेत.
गोपनीय फाईल्सची माहिती असल्यानेच शेटे दबावात!
देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक अनियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू आहे. काहीचे असे म्हणणे आहे की, नितीन शेटे यांच्याकडे अनेक गोपनीय फाईल्स व माहिती होती, जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघडं पाडू शकत होती. त्यामुळे ही आत्महत्या नसून त्यांना तसे करण्यास भाग पाडले असल्याचीच जास्त चर्चा आहे.