चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शनैश्वर देवस्थानशी संबंधित बनावट ॲप प्रकरणात चौकशीतून आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा मोठा खुलासा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनच शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या बनावट अॅप प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात पाच बनावट अॅप धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली आहे. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान व भाविकांची अॅपचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तपास केला. यात शनैश्वर संस्थानने परवानगी दिलेले तीन आणि बनावट चार अॅप अशी एकूण सात अॅपचा समावेश आहे. या सात अॅपची चौकशी करण्यात आली. बनावटव अॅपचे डेव्हलपर्स कोण आहेत, ऑपरेटर कोण आहेत. यांची चौकशी केली. अॅपवर 500, 1800, पाच हजार अशा रकमा जमा आहेत. अॅपच्या माध्यमातून संस्थानला काय फायदा झाला या अँगलनेही तपास करण्यात आला. बनावट अॅप तयार करणारे बाहेरचे आहेत. दोन्ही अॅपचे भाविकांच्या दर्शनाचे रेट वेगवेगळे आहेत.
शनैश्वर देवस्थानने परवानगी दिलेल्या तीन व बनावट चार अॅप मधून संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तब्बल एक कोटी जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. अॅपमध्ये अनेकांचा सहभाग असू शकतो असे निदर्शनास आल्याचे एसपी घार्गे यांनी सांगितले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते.
आयोध्या, वैष्णव देवी दर्शनासाठीही अॅप
शनी शिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थान बनावट अॅपचे प्रकरण समोर आले असतांनाच आता या प्रकरणातमध्ये आयोध्या, वैष्णव देवी, काशी विश्वेश्वर या देवस्थानच्याही नावाचा उल्लेख आहे. तेथील दर्शनासाठी अॅप असल्याचे तपासातून समोर आले आहे. संबंधित अॅपमधून संबंधित देवस्थानची फसवणूक होते की काय याबाबत त्यांना पत्र देणार असल्याचे एसपी घार्गे म्हणाले.
सीईओ दरंदले यांची चौकशी; विश्वस्तांच्या खात्यावर पैसे नाहीत
श्री शनैश्वर देवस्थान बनावट अॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थानचे सीईओ दरंदले यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून काही माहिती घेतली. संस्थानने परवानगी दिलेल्या आणि बनावट अॅपमधून संस्थानला किती फायदा झाला याची त्यांना माहिती विचारली. यांची सविस्तर माहिती दरंदले यांच्याकडून अजून मिळालेली नाही. टेक्नीकल पद्धतीने तपास सुरु असून अजून कोणालाही आरोपी केलेले नाही. तसेच सायबर पथकाच्या चौकशीतून देवस्थान विश्वस्तांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे निदर्शनास आलेले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
एलसीबीत काम करणाऱ्यांना पुन्हा संधी नाही
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये वर्षानुर्षे राहिलेल्यांना आता बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. तसेच यापूव स्थानिक गुन्हे शाखेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थान दिले जाणार नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील गुन्हेगारी गँगची माहिती असणारे, धडाडीचे, पात्रता असणाऱ्यांना स्थान दिले जाणार आहे. सध्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे आणि पात्रता असणाऱ्यांना मुख्यालयात न पाठवता जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला डिटेक्शनसाठी पाठविले जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेत 2021 मध्ये नेमणुका झाल्या होत्या. आता पुन्हा नव्याने दमदार टीम तयार करणार आहोत. तसेच सायबरमध्येही तज्ञ लोकांची टीम नेमली जाणार असल्याचे एसपी घार्गे यांनी सांगितले