निघोज | नगर सह्याद्री
निघोज परिसरात गेली आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून कुकडी नदीला पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.गेली तीन आठवड्यापासून कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडले आहे. मात्र निघोज परिसरात पाणी सुटले नाही याचे कारण स्पष्ट होत नाही.
बैलगाडा शर्यतीमुळे पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दि. १ एप्रिल व दोन एप्रिल असे दोन दिवस बैलगाडा शर्यत सुरू असून पाच लाख रुपये पेक्षा जास्त बक्षीसे विजेत्यांना देणार येणार आहेत. या बैलगाडा शर्यती पुष्पावती नदीकाठी असल्याने या नदीला पाणी सोडल्यास बैलगाडा शर्यतीला अडथळा येऊ शकतो म्हणून पाणी उशीरा सोडण्यात येणार असल्याचे प्रमुख कारण आहे.
मात्र गावांमध्ये पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत दिवसाआड पाणीपुरवठा करीत होती मात्र गेली चार दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राहात आहे. आणी यातील बहुतांश लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्यामुळे कुकडी नदीला तातडीने पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे.