काष्टीच्या भैरवनाथ चौकात बबनराव पाचपुते यांची जाहीर सभा
श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
बबनराव पाचपुते! वय वर्षे ७०. वयाच्या सत्तरीतील या नेत्याने त्याच्या संघटनकौशल्याच्या बळावर संपूर्ण राज्य पालथं घातलं. पक्षीय जबाबदारी आणि सोबतीला मिळालेली मंत्रीपदाची संधी त्याला कारणीभूत ठरली असली तरी त्यांनी त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक कायम दाखवली. जनता पक्ष, जनता दल, कॉंग्रेस, अपक्ष आणि भाजपा असा राजकीय प्रवास करणारा हा नेता आजारपणाने त्रस्त आहे. या मतदारसंघातून त्यांचे चिरंज़ीव उमेदवारी करत आहेत. विक्रमसिंह यांच्या प्रचाराच्या निमित्ताने बबनरावांनी आतापर्यंत एकही सभा घेतली नाही. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.१८) रोजी त्यांनी आमदार म्हणून शेवटची जाहीर सभा आयोजित केली आहे. काष्टी येथील ज्या भैरवनाथ चौकातून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली, त्याच चौकात आता त्यांची आमदार म्हणून शेवटची सभा होत आहे. या सभेत बबनराव पाचपुते काय बोलतात, काय आवाहन करतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
१ जानेवारी १९७७ हे त्यांचे राजकीय पदार्पण होते. आणीबाणीच्या काळात असहकार आंदोलनात त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला. श्रीगोंद्यात ‘जनता पार्टी’ च्या शाखेचे उद्घाटन त्यांनी केले. ९ सप्टेंबर १९७७ रोजी त्यांची स्थानिक संस्था सदस्य (पंचायत समिती) म्हणून निवड झाली. १९७९ मध्ये त्यांनी ’शेतकरी संघटना’ स्थापन केली आणि १९८० मध्ये ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा दिला, १९८१ मध्ये मोठी चळवळ सुरू केली. १४ बबनराव पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि महाराष्ट्र विधानसभेचे उमेदवार म्हणून निवडून आले.
नऊ वेळा विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यापैकी सात वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. या यशाचे श्रेय त्यांचे अनुयायी देतात कारण त्यांनी त्यांच्या श्रीगोंदा येथे राबविलेल्या विविध सामाजिक- आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणकारी योजना. प्रत्येकी वेगळ्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवार अशी त्यांची ओळख आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले.
बबनराव पाचपुते यांनी १९८०-८५, १९८५-९० या सलग वर्षांमध्ये त्यांनी जनता पक्षाच्या वतीने निवडणुका जिंकल्या. १९९०-९५ मध्ये त्यांनी जनता दलाकडून उमेदवारी दाखल केली आणि निवडणूक जिंकली. १९९५-९९ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि ते विजयी झाले. १९९९-२००४ मध्ये ते निवडणूक हरले पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना करण्यात आले. २००४-०९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून यशस्वी झाले आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात वनमंत्री झाले. २००९-२०१४ मध्ये पुन्हा विजयी होऊन आदिवासी विकास मंत्री झाले. २०१४ मध्ये ते भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये सामील झाले, निवडणुकीत त्यांना ८५ हजारापेक्षा जास्त मते मिळाली असतानाही १२ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. मागील म्हणजेच २०१९ मध्ये ते श्रीगोंदा मतदारसंघातून सातव्यांदा विजयी झाले.
कायम संघर्ष करावा लागलेल्या या नेत्याला सध्या आजारपणाने ग्रासले आहे. मात्र, तरीही प्रचंड इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर ते आजही जनतेचे प्रश्न सोडविताना दिसत आहेत. यावेळी विक्रमसिंह यांना पक्षाने उमेदवारी दिली. आजारी असूनही कार्यकर्त्याच्या भेटीगाठी ते घेत आहेत. यावेळी निवडणुकीच्या निमित्तांने त्यांची एकही जाहीर सभा झाली नाही. मात्र, प्रचाराची मुदत संपत असताना शेवटच्या दिवशी काष्टीच्या भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात त्यांनी दुपारी १ वाजता सभा आयोजित केली आहे. या सभेत ते काय भूमिका मांडतात हे ऐकण्यासाठी श्रीगोंद्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.