Vima Sakhi Yojana: देशातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाच्या योजनांचा अवलंब करत आहे. यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसह, महिलांना रोजगार मिळवण्यासाठी एक नवी संधी दिली जात आहे. ‘विमा सखी योजना’ असे या योजनेचे नाव असून, त्याचं उद्घाटन ९ डिसेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणाच्या पानिपत येथून होणार आहे.
विमा सखी योजनेचा उद्देश:
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना विमा एजंट म्हणून स्वयंरोजगाराच्या संधी प्रदान करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आहे. यानुसार महिलांना विमा पॉलिसी विकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे त्यांचा उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत होईल. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील विमा सेवांचा विस्तार होईल आणि विमा क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढेल.
विमा सखी योजनेचे फायदे:
आर्थिक सहाय्य: महिलांना योजनेत भाग घेतल्यावर ₹7,000 पर्यंत मासिक वेतन मिळेल.
प्रोत्साहन रक्कम: दुसऱ्या वर्षात ₹6,000, तिसऱ्या वर्षात ₹5,000 मासिक वेतन मिळेल. याव्यतिरिक्त, तिसऱ्या वर्षात ₹2,100 प्रोत्साहन रक्कमही दिली जाईल.
कमिशन आधारित उत्पन्न: विमा पॉलिसी विकण्यावर महिलांना अतिरिक्त कमिशन मिळेल.
स्वयंरोजगाराच्या संधी: महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षण मिळून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
ग्रामीण भागात विम्याचा विस्तार: या योजनेमुळे, ग्रामीण भागांमध्ये विमा सेवा पोहोचवली जाईल, जिथे पूर्वी यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या.
महिला सक्षमीकरण: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांना सामाजिक सन्मान मिळवण्यास मदत होईल.
पात्रता:
वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आणि किमान १० वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता.
कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र अनिवार्य.
अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन पोर्टलवर किंवा LIC च्या जवळच्या कार्यालयात केला जाऊ शकतो. योजनेसाठी अर्जाची संपूर्ण माहिती ९ डिसेंबर २०२४ रोजी उपलब्ध होईल.