Breaking News: दौंड शहरात मृत अवस्थेत अर्भके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साधारणतः दहा ते अकरा अर्भक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस शोध घेत आहेत. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात नवजात बालकांचे अर्भक मृत अवस्थेत सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. शहरात अर्भक सापडल्याने याच परिसरात गर्भपात होत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे सर्व अर्भक हे प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले असल्याचे आढळून आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत घटनेची माहिती घेत उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉक्टरांना तात्काळ येथे बोलविण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
राज्य महिला आयोगाकडून ट्विट
राज्य महिला आयोगाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ‘ पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे. हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत,’ असे त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.