शिर्डी । नगर सहयाद्री:-
पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान साईंची शिर्डी आहे. या शिर्डी संस्थानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून सध्या तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी पाठवली.
या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु आहे. पोलिस विभागाकडून ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू असून, ही धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की त्यामागे कुठली तरी गंभीर योजना आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.
शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानने या घटनेबाबत तपशील देण्यास नकार दिला आहे. तरीही, या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात येत असून, सीसीटीव्ही आणि कुतूहलजनक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. हे पहिल्यांदाच नाही, यापूर्वीही साई संस्थानला अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते.
मात्र त्यातील बहुतांश धमक्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तरीही, पहलगाम हल्ल्यानंतर आलेली ही नवीन धमकी अधिक गंभीर मानली जात आहे. सध्या शिर्डीमध्ये भाविकांची वर्दळ असून, पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं सांगितलं आहे.