बीड / नगर सह्याद्री :
धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत आरोपांचा सपाटा लावला. त्यांनी अजित पवार यांना विनंती करत धनंजय मुंडेंना पक्षात ठेवू नये, असी विनंतीही केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असून, माझ्याकडे ऑडिओ क्लिपसह सर्व पुरावे आहेत,’ असा थेट दावा जरांगे यांनी केला आहे. आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीने अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप मुंडेंवर त्यांनी केला. आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग, मेसेज आणि इतर पुरावे असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी सरकार आणि पोलिसांकडे केली आहे. जरांगे यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण लागले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.
जरांगेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी –
धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या हत्येच्या कटाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, ‘राज्यातील जनतेसमोर एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी तो मेळावा घेतला. राज्यात जातीय वातावरण कोण तयार केले. बीड जिल्ह्यात ओबीसी मधल्या अनेकांची घर जाळी ही प्रवृत्ती कोणाची. मला तलवारीने मारायला येणाऱ्याची मी गळाघेट घेतली. जरांगे यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं. तुमची तयारी कधी? EWS मध्ये जास्त आरक्षण. तुम्ही हाके यांना मारलं, तुम्ही वाघमारेंना मारलं ही प्रवृत्ती कुणाची. माझा त्यांचा बांधला बांध नाही. मी कट कशाला करू.’
जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा –
धनंजय मुंडे विश्रामगृहातील बैठकीबद्दल सांगितले की,’निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नाव घेतले. मी शासकीय विश्रामगृहात दर सोमवारी बसतो. अनेक जण भेटतात. आता अटक झालेले त्यापैकी काही भेटले असतील. यांच्यात असला कट, त्यांनीच पाठवले का? ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत. माझी प्रतिमा कशी तयार केली जात आहे. कारण मी सभेत दोन प्रश्न उपस्थित केले म्हणून. माझं म्हणणं आहे या प्रकरणात CBI ने चौकशी केली पाहिजे. माझी ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा. आरोपींची, जरंगेंची आणि माझीसुद्धा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा.’
मला संपवण्याची धमकी –
धनंजय मुंडे यांनी माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘जरांगे शिवीगाळ करणार का? घरात इंग्रज आले होते का? असे प्रश्न बोलतात. आमची देखील मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसीमधून नाही. AI ने आज काही तयार करतात. मनोज जरांगे यांना या सगळ्या गोष्टी महागात पडतील. मी जीवनात पहिल्यांदा ओबीसी मेळाव्यात गेलो. अनेकदा मला बाकीच्यांनी हकलून काढलं. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ५०० मराठा बांधवांचे जीव गेले. मला संपून टाकण्याची ऑन एयर धमकी दिली आहे. त्यांनी त्यांची माणसं पाठवायची. ओळख पटवून फोटो काढायचे. ब्रेन मॅपिंग, नार्को, सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी CBI केली गेली पाहिजे.’
जरांगेंना शेतकरी नेता व्हायचंय –
तसंच, ‘दादागिरी कोणाची आहे. समाजा समाजात अंतर कोणी पाडलं. अशा खोट्या केसेस करून ओबीसी समाजाचा आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप्प राहील का? तुमच्या मेव्हण्याच्या वाळूचे ट्रक किती पकडले. मी सरकारला विचारतो त्यात काय ॲक्शन झालं. कुणाला संपवायचं माझे संस्कार नाहीत. मनोज जरांगे मला संपवण्याचा प्रयत्न करू नका. आता ते आरक्षणावर बोलत नाही त्यांना शेतकरी नेता व्हायचं आहे.’,असे धनंजय मुंडे म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी आवाज उठवला –
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, ‘३० वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहे. जात-पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण आण्णा आणि गोपीनाथ मुंडेंनी दिली. मी ज्या जातीत जन्माला आलोय त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीमधील सहकारी मित्र आहेत. जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. त्यावेळी पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, असा ठराव बीड जिल्हा परिषदेत घेतला. ती महाराष्ट्राची पहिली जिल्हा परिषद होती. त्यामुळे राज्यातील इतर ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी चळवळ सुरू झाली.’
परळीत मराठ्यांची आंदोलने झाली त्यात मी सहभागी होतो. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीनंतर जरांगेंचे आंदोलन झाले. त्या आंदोलानाला जागा देण्यापासून पाणी देण्यापर्यंत वाहने देण्यापर्यंत मदत केली.मेटे, संभाजीमहाराज यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या लढ्यासाठी उतरले. मराठ्यांच्या मुंबईतील मोर्चात सहभागी होता आले. त्यामध्ये बोलण्याची संधीही मला देण्यात आली. ५ वर्षे राज्यात विरोधीपक्ष नेता म्हणून काम केले. त्या काळात मराठा आंदोलने झाली तेव्हा सभागृह बंद केले. मराठा समाजाला आरक्षणासाठी आवाज उठवला. त्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत.
जरांगेंना उपोषण सोडायला मी लावलं –
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नगर जिल्ह्यात कोपर्डीला बलात्कार प्रकरण झाला. त्यावेळी तिथे कुणीही गेले नव्हते. मी तिथे पहिल्यांदा गेलो. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत अधिवेशन सुरू करू दिले नाही. ही मराठा समाजाप्रति आमची निष्टा आहे. मी पालकमंत्री होतो कुणबीचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळी ८० हजार कुणबीची प्रमाणपत्र बीडमध्ये मिळाले आहेत. तुम्ही रेकॉर्ड तपासू शकता. मंत्री म्हणून जरांगेंना उपोषण सोडायला लावलं. माझ्या हातून त्यांनी उपोषणही सोडले. माझं त्यांचे वैर नाही. १७ तारखेंची सभा सोडता त्यांच्याविरोधात मी एकाही शब्दाने बोललो नाही, आरोप केले नाहीत. अशास्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला १८ पगड जातीला सोबत घेऊन जाताना हा व्यक्ती कसाच आवरत नाही. धनंजय मुंडे हा या पृथ्वीतळावरच नसावा, असे जरांगेंना वाटतेय. १७ तारखेच्या सभेला मी त्यांना फक्त दोन प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मिळाली नाहीत.
मनोज जरांगे आणि सुरेश धस हत्येच्या कटानंतर करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर स्फोटक आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्या वरती करण्यात आलेला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय देशमुख, सुरेश धस आणि करुणा मुंडे यांच्या बाबतीतही असाच कट रचण्यात आला होता. यावर करुणा मुंडे यांनी बोलताना म्हटले आहे की जो स्वतःच्या बायकोला संपू शकतो. तो कोणालाही संपू शकतो आणि या अगोदर दादा गरुड हा व्यक्ती माझ्याकडे आला होता. आणि त्यांनी मला कॉल देखील केला होता. आणि बरीच काही माहिती त्यांनी माझ्याजवळ दिली आहे. असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे.



