अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31) यांनी व्याजाने घेतलेल्या 26 लाख रुपये परतफेडीसाठी 49 लाख 1 हजार 500 रुपये रोख, ऑनलाईन आणि आर.टी.जी.एस.द्वारे दिले. तरीही, कविता रमाकांत पराळे आणि सोहन सुरेश सातपुते यांच्यासह इतरांनी त्यांच्यावर दबाव टाकून बळजबरीने त्यांची होन्डा कंपनीची कार हिसकावली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कविता पराळे, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे आणि सोहन सातपुते यांच्यासह 4 ते 5 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून 2024 ते 7 जुलै 2025 या कालावधीत साकळचंद कस्तुरचंद पोरवाल ज्वेलर्स, सराफ बाजार आणि गणेशवाडी येथील फिर्यादीच्या घरी हा प्रकार घडला. जून 2025 मध्ये कविता पराळे ही फिर्यादीच्या घरी येऊन पैसे मागत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. तसेच, फिर्यादीच्या वडिलांच्या नावावरील कार बळजबरीने घेऊन गेली.
7 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता कविता, रमाकांत, माहेश्वरी, प्रणव, ऋषी आणि 4 ते 5 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घरी अनधिकृत प्रवेश केला. यावेळी रमाकांत पराळे याने फिर्यादीचा मुलगा वियान याला टी-शर्टला धरून उचलले आणि कट्टा डोक्याला लावून 15 लाख रुपयांची मागणी केली. तसेच, पैसे दिले नाही तर याला मारून टाकतो, अशी धमकी दिली.
फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने रमाकांत याला हातापाय पडून वियानला सोडवले. या घटनेत रमाकांत याने फिर्यादीच्या पत्नीला लज्जास्पद वागणूक दिली. तिचा कुर्ता फाटला आणि माहेश्वरी पराळे हिने तिचे केस ओढत घराच्या दारापर्यंत नेले. तसेच, शिवीगाळ आणि धमक्या देत सर्वजण निघून गेले. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.