प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप
मुंबई । नगर सहयाद्री:-
गेल्या काही काळातील सगळ्या घटना बघितल्या तर फक्त पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना संपवले जात आहे. हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लोकांसोबत तसे घडताना दिसत नाही, ही बाब प्रविण गायकवाड यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाल्याची माहिती मला मिळाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याची योजना आखण्यात आली.
आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विचारधारेचा तिसरा टप्पा सुरु केला आहे. त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवणाऱ्या संघटना संपवण्याचा डाव आहे असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले.सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे.
माझ्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याला तुरुंगात चांगली सर्व्हिस मिळावी, यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. त्याला अजिबात त्रास देऊ नका, असे सांगितले जात आहे. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा मास्टमाईंड कोण, हे शोधण्याचे काम सरकारचे आहे. आता या सगळ्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे, असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले. ते सोमवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.