अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिवजयंती मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो हातात घेऊन नाचणार्या तरूणाविरूध्द भारतीय नागरी संहिता कलम २२३ सह मुंबई पोलिस अधिनियम ३७ (१) (ड) १३५ प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार बाळासाहेब धारूरकर (रा. सोनारगल्ली, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. अंमलदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवारी शहरातून काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकावण्यात आला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. शहरास राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार हा खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा फोटो हातात घेऊन मिरवणुकीत नाचताना दिसून आला.
त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिरवणुकीत राजकीय नेत्यांसह लॉरेन्स बिश्नोईचा, तसेच आणखी काही फोटोही झळकावण्यात आले. लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकावण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याने कोणाच्या सांगण्यावरून हा फोटो झळकावला, याचा तपास करण्याची गरज आहे.