अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरातील व्यापार्यांच्या नगर तालुक्यातील शेत जमिनींवर ताबा मारण्याचे प्रकार समोर येत आहे. मार्केट यार्ड, कोठी रस्ता येथील सुदर्शन डुंगरवाला यांच्या नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील शेतीवर ताबा मारल्याचा प्रकार ताजा असतानाच व्यापारी अनिल वालचंद गांधी (वय 60 रा. सिताबन लॉन, कोठी रस्ता, अहिल्यानगर) यांच्या वाटेफळ (ता. नगर) शिवारातील शेत जमिनीवर आठ ते दहा महिलांनी ताबा मारला आहे.
दरम्यान, या प्रकरणी अनिल गांधी यांनी गुरूवारी (9 जानेवावरी) दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आठ ते दहा महिलांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल यांची वाटेफळ शिवारात शेत गट नंबर 60 मध्ये शेती आहे. त्या ठिकाणी अनोळखी आठ ते दहा महिलांनी पाल ठोकून ताबा मारला आहे. शेतात अनाधिकृतपणे अतिक्रमण का केले अशी विचारणा करण्यासाठी अनिल 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास गेले असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. दरम्यान, ताबा प्रकरणावरून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापार्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर ताबा मारणार्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
दरम्यान, नगर शहरातील ताबामारीचे लोन नगर तालुक्यात देखील पसरले आहे. अधीक्षक ओला यांच्या आदेशामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे.