अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी
पारनेर | नगर सह्याद्री
माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट कारभारात आकंठ बुडालेल्या राजे शिवाजी पतसंस्थेत आणखी 67 कोटींचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. लेखा परीक्षण अहवालात हे स्पष्टपणे समोर आल्यानंतर विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी पारनेर पोलिस ठाण्यात अपहाराशी संबंधीत 40 घोटाळेबहाद्दरांसह 6 कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लेखा परीक्षकांनी दहा दिवसांपूव फिर्यादीचा ड्राप्ट सादर केला असतानाही पारनेर पोलिसांना अद्यापही गुन्हा दाखल करण्यासाठी मुहूर्त न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
10 दिवस उलटले तरी पारनेर पोलिसांना मुहूर्त सापडेना!
विशेष लेखा परीक्षकांनाी राजे शिवाजी पतसंस्थेतील अपहाराशी संबंधीत 46 जणांची यादी आणि फिर्यादीची प्रत पारनेर पोलिस ठाण्यात समक्ष सादर केली. त्याला आत्ता दहा दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, तरीही पारनेर पोलिसांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अथवा वरिष्ठ कार्यालयास आजअखेर कळवले नाही. इतर कामे खूप असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले.
राजे शिवाजी पतसंस्थेत संचालक मंडळावर यापूवच गुन्हा दाखल झाला आहे. आता अंतिम लेखा परीक्षण अहवालानुसार जवळपास 66 कोटी 29 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल होण्यासाठी मी माझ्या सहीने दहा दिवसांपूवच लेखी फिर्याद पारनेर पोलिसांकडे दिली आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्यास का विलंब केलाय हे मला सांगता येणार नाही.
– राजेंद्र निकम
जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था.
लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांचा अहवाल आणि फिर्याद आमच्याकडे प्राप्त झाली आहे. पोलिस ठाण्यातील अन्य काही महत्वाच्या कामांमुळे हा अहवाल अद्याप वरिष्ठांना पाठवला नाही. दोन दिवसांत अहवाल पाठवला जाईल आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतरच आरोपी कोण आहेत हे समोर येईल.
– समीर बारवकर
पोलिस निरीक्षक, पारनेर
निकम अन् बारवकर यांच्यापैकी एकाकडून संभाव्य आरोपींची नावे बाहेर!
राजे शिवाजी पतसंस्थेतील कथीत 67 कोटींच्या अपहारात 46 जण आरोपी असल्याचा अहवाल पोलिसांना सादर केला गेला. त्यातील 46 जण कोण आहेत हे फक्त जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम आणि पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांनाच माहिती होते आणि आहे. प्रसार माध्यमांना याबाबत कुणकुण लागताच ही नावे गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही देऊ शकत नसल्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्पष्ट केले. मग, असे असताना या 46 पैकी अनेकजण पसार कसे झाले? याचाच अर्थ जे आरोपी होणार आहेत, त्यांची नावे बाहेर आणण्यात राजेंद्र निकम अथवा समीर बारवकर यांचाच ङ्गसिंहाचा वाटाफ असल्याची चर्चा झडू लागली आहे.
आरोपी सावध केले असले तरी सुटणार कोणीच नाही!
आर्थिक स्वरुपाचा गंभीर गुन्हा असल्याने व लेखा परीक्षकांच्या अहवालात स्पष्टपणे सर्व गोष्टी नमूद असल्याने या गुन्ह्याशी निगडीत 46 आरोपींना अटक होणारच आहे. पंचवीस लाखांच्या आतील रकमेचा अपहार किंवा त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलिस स्टेशनशी निगडीत पोलिस निरीक्षकांना आहे. त्यावरील म्हणजेच त्यापेक्षा जास्त रकमेचा अपहार असेल तर त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा आणि अप्पर पोलिस अधीक्षकांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल होत असतो. राजे शिवाजी बाबत लेखा परीक्षकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी होण्याचे सोपस्कर बाकी आहे. त्यांच्याकडून ते होताच यातील सर्वांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याआधीच आरोपींना कोणी कितीही सावध केले आणि आरोपी करणार नाही असे म्हटले तरी यातून कोणीही सुटणार नाही! यादीतून वगळले जाईल असे कोणी सांगत असेल आणि त्यासाठी पैसे मागीतले जात असतील तर त्याचे नाव नगर सह्याद्रीशी संपर्क साधून कळवा! तशा लाचखोरांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल.