मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे हस्तांतरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरूष लाभाथ घुसलेच कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये किती कोटींचा घोटाळा झाला यांचा आकडा सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केला. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, ’सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड होत आहे. लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही आणि करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही मी खोटे आरोप करणार नाही.’ लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची सामूहिक जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी डिजिटल इंडियाच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्याचा जो आकडा जाहीर केला आहे तो खूपच मोठा आहे. त्यांनी या घोटाळ्याची माहिती दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा घोटाळा नेमका कुणी केला?, कसा केला?, त्यात कोणचा सहभाग आहे? याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. पण आता यामुळे जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.
मग डीबीटीचा फायदा काय?
’डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, डीबीटी, थेट हस्तांतरण प्रक्रियेतून लाभाथ महिलांच्या अकाऊंटमध्ये पेसे जातात. त्यासाठी अनेक नियम आणि चाळणी प्रक्रिया आहे. एक एक कागद तपासला जात आहे. आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स तपासले जातात. लाभाथ महिलांच्या खात्यात डायरेक्ट पैसे गेले. मग पुरूषांच्या खात्यात पैसे जात आहे हे समोर का आले नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.