अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिकेत अभियंता, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वीजतंत्री, वायरमन, लॅब टेनिशियन अशा पदांवर गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणार्या २२ कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला होता. सर्वसाधारण सभेच्या ठरावात २८ जणांची नावे मंजूर केली आहेत.
वाढीव सहा नावांमध्ये पाच नावांवर आक्षेप असून यात मनपात सध्या मानधनावर कार्यरत नसलेल्या कर्मचार्याचे नावही घुसवण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी थांबवली आहे.
अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचा विषय १५ सप्टेंबरच्या सभेसमोर होता. यात प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी १, परिचारिका ४, लॅब टेनिशियन १, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) ३, कनिष्ठ अभियंता (टो मोबाइल) १, विजतंत्री २, वायरमन १० अशा २२ कर्मचार्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची शिफारस केली होती.
त्याची यादीही सोबत जोडली होती. सभेत यावर कोणतीही चर्चा न होता विषय मंजूर करण्यात आला. मात्र, प्रशासनाकडे ठराव पाठवल्यावर त्यात २८ नावे असल्याचे समोर आले.आस्थापना विभागाने प्रस्ताव व ठरावाची माहिती प्रशासक जावळे यांच्याकडे निर्णयासाठी सादर केली आहे. मात्र, वाढीव नावांमुळे प्रशासकांनी हा प्रस्ताव थांबवला आहे.
२८ पैकी काही कर्मचारी वयोमर्यादेत बसत नाहीत. तसेच, यापूर्वी मानधनावर कार्यरत असलेला मात्र, सध्या कार्यरत नसलेल्या एका कर्मचार्याचे नावही या यादीत असल्याचे समजते. प्रशासनाने प्रस्ताव करताना किमान पाच वर्षांपेक्षा अधिक काळ मानधनावर मनपात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता प्रशासक या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.