अहिल्यानगर | नगर सह्याद्री
संगीताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदिती गराडे हिच्यासारखी हार्मोनियमचे सूर निनादणार आहे. या महोत्सवात हार्मोनियम वादन करण्याचा बहुमान मिळालेली ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आजपर्यंतची पहिलीच महिला वादक ठरली आहे.
पुण्यात 18 ते 22 डिसेंबर या दरम्यान सवाई गंधर्व महोत्सव होत आहे. त्यात 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या सांगितीक कार्यक्रमात नगरची रहिवासी असलेली आदिती हार्मोनियम वादन करणार आहे. ही नगरकरांच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची बाब आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेल्या आदितीच्या सांगितिक प्रवासात तिला रोहिणी कुलकण, संपदा चौधरी, कुमुदिनी बोपडकर, धनश्री खरवंडीकर आणि प्रमोद मराठे यांसारख्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभलेे आहे. या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सातत्याने घेतलेले कष्ट यामुळेच तिच्या या प्रवासाचा आलेख उंचावत गेला.
अत्यंत प्रगल्भ संवादिनी वादक म्हणून आदितीने अल्पावधीतच अनेक मान्यवरांचा विश्वास संपादन केलो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेल्या अनेक प्रसिद्ध गायकांसोबत संवादिनीची साथ करण्याचा बहुमान तिला मिळालेला आहे. आजवर आदितीला अनेक पुरस्कार मिळालेले असून दूरदर्शनवरील संगीत सम्राट या मालिकेतही ती झळकली होती.
आदिती ही अहिल्यानगरमधील रमेश हार्मोनियमचे संस्थापक, भजन सम्राट आणि प्रसिद्ध हार्मोनियम मेकर व वादक आनंदराव रंगनाथ गराडे आणि महावितरणचे निवृत्त अधिकारी मधुकर रामदास सांबरे यांची नात असून रेणावीकर विद्या मंदिरमधील शिक्षिका स्वाती दत्तात्रय गराडे यांची कन्या आहे. आदितीला मिळालेल्या या बहुमानाबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनीही तिचे अभिनंदन केले आहे.