संगमनेर । नगर सहयाद्री:-
राज्यसरकारने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली असताना किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक आहे. त्यामुळे शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणी नुसार मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंगळवारी तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
घोषणा करूनही अद्याप कारवाई नाही.
राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी जुलैच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर तत्कालीन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले होते मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही.
एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम कोणते?
-एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारे कॅफेन शरीराला अत्यंत घातक
-कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो.
-अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.
वय वर्ष १८ खालील मुलांसाठी विक्री नाही
स्टिंग आणिइतर काही एनर्जी ड्रिंक्सची किराण मालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वस्तूता हे एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते. मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट वयातील मुलांना याची विक्री करतात