बीड | नगर सह्याद्री
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून राज्याचं राजकारण देखील तापलं आहे. या घटनेतील आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये मूक मोर्चा देखील काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चकडून करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच या प्रकरणासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, त्याचप्रमाणे सदर प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.
मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने या हत्या प्रकरणी सरकारकडे मागणी करण्यात आली. याविषयी बोलताना,आजचा बीडचा जो मोर्चा आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या मुलीला, त्यांच्या आईला, पत्नीला, त्यांच्या भावाला, न्याय देण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केलं आहे. या मोर्चाला बीडसह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत. आम्ही दोन दिवसाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चांपूव वाल्मीक कराडला आणि त्याच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे होती. सरकार कारवाई केल्यासारखा दाखवते, पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. आज 19 दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे. आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे, आज हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चातून सरकारने धडा घ्यावा बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे.
‘देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढत राहणार’
“माझी कोणाशीही काहीही चर्चा झालेली नाही. उपोषण करण्याचा निर्णय हा माझा आहे. मात्र, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांच्या न्यायासाठी लढणं हे माझं काम आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करणार आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार आहे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच पुढे त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका-एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी, तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, ते कधी लावणार असा प्रश्न आहे. तो जो वाल्मिक कराड आहे, त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा. या केसच्या संदर्भामध्ये आमची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. यामध्ये वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्वल निकम आणि सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी. हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावं, कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे, सरकारने तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा अन्यथा याच्या परिणाम सरकारला भोगावे लागतील असे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.
न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही ः जरांगे पाटील
बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने आजचा मोर्चा आहे. संतोष भैया देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की, एकाने पण घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना जाग आणणार आहे. संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाच्या पण बापाला येऊ द्या. मॅटर मात्र मी दाबू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती संभाजीराजे आक्रमक
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अंत्यत क्रूर पद्धतीने हत्या झाली. महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मला सांगायलाही लाज वाटते. बीड पॅडर्न हा बिहार सारखं झाला आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. 19 दिवस झाले पण अजूनही आरोपींना अटक झालेलं नाही. वाल्मिक कराडही फरार आहे आणि त्याला संरक्षण देणाऱ्या तेथील मंत्ऱ्याची अजूनही मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा अद्याप राजीनामा का घेतला नाही?, असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही : फोटोवर संदीप क्षीरसागर यांचे स्पष्टीकरण
संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापासून आक्रमकपणे लावून धरली. त्यानंतर आज बीड येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर त्यांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोबाबत संदीप क्षीरसागर यांनी खुलासा केला. संदीप क्षीरसागर म्हणाले, “सध्या समोर येत असलेला फोटो निवडणुकीदरम्यान व्हायरल करण्यात आला होता. तो फोटो मॉर्फ केलेला आहे. मी कधीही इनशर्ट करत नाही. मी शर्ट बाहेर सोडलेले असते. या फोटोबाबत मी तक्रार केलेली असून फॉरेन्सिक तपासणीसाठीही सदर फोटो पाठवून दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात मी आवाज उचलू नये, म्हणून मला शांत करण्यासाठी असला प्रकार केला जात आहे. पण यानिमित्ताने एक सांगतो मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.”असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तो फोटो सर्वात आधी बायकोला दाखवला..
पुढे संदीप क्षीरसागर यांनी, “सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर तो सर्वात आधी मी माझ्या पत्नीला दाखवला होता. पत्नीही तो फोटो पाहून हसली होती. राजकारणात कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात, हे त्या फोटोवरून दिसते. निवडणूक काळात तो फोटो व्हायरल करूनही लोकांनी मला विजयी केले. कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आगामी अधिवेशनात अशा मॉर्फ फोटोबाबत काहीतरी नियमावली असावी, अशी मागणी करणार आहे”, असे म्हटले. दरम्यान, आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला गेला आहे. या मोर्चात मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगेही सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले, “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, आरोपींना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. आरोपींना तात्काळ अटक करा” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
वाल्मिक कराड रक्तपिपासू, 20 खून केले
वाल्मिक कराड विषयी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी,” बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून वंजाऱ्यांचेच झालेत आणि तेही यांनीच केले आहेत. वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो, तसा नरभक्षक वाल्मिकी आहे. खरं तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका, तो वाल्या आहे, या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं, वाल्मिक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू आहे, आत्तापर्यंत 20 वंजारा समाजाचे खून त्याने केले आहेत. आमची जात यांच्यामुळे बदनाम होते आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी पहिली मागणी मी केली होती, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस
बीडमधील घटनेच्या तपासासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, सीआयडी तपास करु देत किंवा आणखी कोणी, पोलीस काही वरतून येत नाहीत. शेवटी वरती असतं ते सरकार, सरकार जसा आदेश देतं तसं पोलीस यंत्रणा काम करते हे गेल्या काही वर्षात सिद्ध झालंय. याचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहे, मी विधानसभेत आणि बाहेरही तेच सांगितलंय. धनंजय मुंडेंनी खून केलाय असं मी म्हणत नाही. पण, वाल्किक कराडचा बाप तो आहे, तो स्वत: खून झाल्यानंतरही सांगतोय की, वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे. येथील विष्णू चाटे, घुले, हे कुणाची माणसं आहेत. यांच्याकडे इम्पोर्टेड गाड्या, जमिनी, रिव्हॉल्वर हे सगळं कुठून आलं, असा सवालजितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
“…तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या”, ‘या’ आमदाराची फडणवीस अन् पवारांकडे मोठी मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील काही आरोपी अद्याप देखील फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील सहभागी झाले होते. या मोर्चात बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली आहे.