पारनेर । नगर सहयाद्री:-
वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाजदिपूर हे आदिवासीबहुल गाव असून, येथील सुमारे १२०० लोकसंख्या भिल्ल आणि धनगर समाजाची आहे. हे गाव स्वातंत्र्यापासून रस्त्यापासून वंचित आहे.
वडगाव सावताळपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वडगाव सावताळ ग्रामपंचायत हद्दीतील या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच संजय रोकडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ०९ ऑगस्ट २०२५ पासून वडगाव सावताळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांचा रस्त्याअभावी शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी होणारा त्रास असह्य झाला आहे. रस्ता झाल्यास गाजदिपूरच्या विकासाला चालना मिळेल, असे सरपंच रोकडे यांनी सांगितले. याबाबत प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.