नागपूर । नगर सहयाद्री:-
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याच प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, असे विधानसभेत आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीइथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनज यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये 6 डिसेंबरला अवाडा एनजचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली. अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला.
बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली.
तसेच सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता, पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण ही निर्घृण हत्या आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मकोकाच्या गुन्ह्यास हे पात्र होतात, मकोका लावला जाईल, या गुन्ह्यात दुरान्वये संबंधित असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना ही गुन्ह्यात सामील केले जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भूमाफिया व इतर गुन्हेगारांवर एक मोहीम हाती घेऊन संघटीत गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल. दोन प्रकारची चौकशी करणार आहेत. आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांची एक एसआयटी स्थापन करू, ती चौकशी करेल. न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तीन ते सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण करणार आहोत. युवा सरपंचाच्या जीवाचे मोल पैशातून करणार नाही, पण त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत सरकार करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोक्का लावणार
या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत. त्यांच्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बीडमधील अराजकतेचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यासर्व प्रकरणात पोलीसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पोलीस प्रशासन त्यासाठी दोषी ठरवले. अगोदर फिर्याद नोंदवायची आणि नंतर बी समरी करायची या खेळीवर आसूड ओढला.
एसआयटी चौकशी
या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्याअंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एस आय टी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास होईल. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येईल. साधारणपणे तीन ते सहा महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तेरावापूर्वी आरोपींना जेरबंद करा
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोका लावू, असे सांगितले असून एसआयटी चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अधिवेशनात फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्या माझ्या भावाच्या तेरावा आहे. त्यापूर्वी आरोपींना जेरबंद करा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी फडणवीसांकडे केली आहे.