अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे आणि उपसरपंच संतोष खोबरे यांना शिवीगाळ करणाऱ्या स्वामी सर्जेराव चव्हाण (रा. घोसपुरी) याने ग्रामस्थ विठ्ठल चंद्रभान हंडोरे (वय 37) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार दोन ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वामी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल हंडोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या वतीने झाडे लावण्यासाठी जागा साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी स्वामी चव्हाण याने सरपंच आणि उपसरपंचाला शिवीगाळ सुरू केली. विठ्ठल यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, चव्हाणने त्यांच्यावर दगडाने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.
डोक्यावर आणि पाठीवर गंभीर मार लागल्याने विठ्ठल खाली पडले. यानंतर चव्हाणने त्यांच्या पोटावर बसून गळा दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केला.जखमी विठ्ठल यांच्या फिर्यादीवरून पाच ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वामी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत.