उमेदवारी विकल्याचे पडसाद उमटले | शिवसैनिकांसह दोन्हीकडील नाराजांची फौज अपक्षांच्या सोबतीला गेल्याने चुरस वाढली / अदृष्य रसद अन् शक्ती भेटल्यास राहुल जगताप, संदेश कार्ले, चंद्रशेखर घुले दिसू शकतात विधानसभेत!
सारिपाट / शिवाजी शिर्के
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचे सोपस्कर एकदाचे पार पडले. या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कर्जत-जामखेड आणि राहुरी या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्य तीन विधानसभा मतदारसंघात राहुल जगताप (श्रीगोंदा), संदेश कार्ले (पारनेर) आणि शेवगाव (चंद्रशेखर घुले) यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. या तिघांनाही मोठा जनाधार असल्याने त्या- त्या मतदारसंघात हे तिघेही दुसर्या क्रमांकाची मते घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच अर्थ या उमेदवारांची त्यांच्या मतदारसंघात महायुती अथवा महाविकास आघाडी यांच्या उमेदवाराशी थेट लढत होणार आहे. या तिनही अपक्ष उमेदवारांना अदृष्य रसद मिळाली तर हे तिघेही विधानसभेत निवडून आलेले दिसल्यास आश्चर्य वाटू नये!
श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवारी विकत आणल्याचा आरोप असलेल्या शिवसेना उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या विरोधात स्थानिक शिवसेनाच विरोधात असल्याचे चित्र कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर अजित पवार गटात दाखल झालेल्या नागवडे यांनी शिवबंधन बांधले. मात्र, त्यांनी ही उमेदवारी आणि जागाच विकत घेतल्याचा आरोप त्यांना पुसता आलेला नाही आणि ते आता शक्य देखील नाही. पैशाच्या जिवावर काहीही करु शकतो हे नागवडे यांनी करुन दाखवले असले तरी श्रीगोंद्यातील जनतेच्या ते पचनी पडलेले नाही. घनश्याम शेलार यांनी धूर्त चाल खेळली आणि काळाची पावले ओळखत उमेदवारी मागे घेतली. राहुल जगताप यांच्यावर झालेला अन्याय तालुक्यात सहानुभूती मिळवत असताना दुसरीकडे भाजपाने शेवटच्या क्षणी अपेक्षेप्रमाणे सौ. प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी विक्रम पाचपुते यांची उमेदवारी अंतिम केली. त्यामुळे आता विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यात प्रमुख लढत होईल असे पहिल्या टप्प्यातील निरीक्षण आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीने काशिनाथ दाते यांना तर महाविकास आघाडीने सौ. राणी नीलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. त्या दोघांचीही उमेदवारी कायम राहिली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे सुजित झावरे, श्रीकांत पठारे या दोन प्रमुखांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. माजी आमदार विजय भास्करराव औटी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. याशिवाय माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनीही त्यांचा अर्ज कायम ठेवला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांची गावे पारनेरला जोडली आहेत. या दोन्ही गटांमधील गावांचे मिळून जवळपास एक लाख मतदान पारनेरला जोडलेले आहे. नगर तालुक्याचा आमदार करण्याची संधी ही टॅगलाईन घेऊन संदेश कार्ले यांनी गेल्या तीन महिन्यांपासून रान पेटवले आणि गावेच्या गावे एक केली. कार्ले यांनी माघार घ्यावी यासाठी मोठे प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. आता तेच कार्ले हे काशिनाथ दाते आणि राणीताई लंके यांच्याशी थेट लढत देणार आहेत. कार्ले यांना अदृष्य शक्ती मिळाली तर पारनेरमध्ये इतिहास घडून अपक्ष उमेदवार आमदार होऊ शकतो हे सिद्ध होऊ शकते.
शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उमेदवारी कायम ठेवली. महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे, महायुतीच्या मोनिकाताई राजळे यांच्या विरोधात घुले उतरले असताना हर्षदाताई काकडे, किसन चव्हाण यांनी देखील उमेदवारी कायम ठेवली आहे. ढाकणे आणि राजळे यांच्या विरोधातील नाराजी, त्यांची निष्क्रीयता आणि उद्याच्या सत्तेत अपक्षांची घ्यावी लागणारी साथ विचारात घेता चंद्रशेखर घुले यांनी त्यांची उमेदवारी विचारपूर्वक ठेवल्याचे मानले जाते. ढाकणे आणि राजळे यांच्यात पाथर्डी तालुक्यात मतविभाजन होणार असताना त्याचा फायदा घुले यांना मिळणार आहे. मात्र, शेवगाव तालुक्यातून त्यासाठी निर्णायक आघाडी घेण्याचे काम घुले यांना करावे लागणार आहे.
नगर शहरात महायुतीच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी उमेदवारी कायम ठेवली. शेवटच्या काही सेकंदात अर्ज राहिला असे सांगितले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीत कालपासून वरिष्ठ स्तरावर बऱ्याच हालचाली झाल्या. अखेर प्रा. गाडे यांनी पत्रकार परिषद घेत टायमिंगच्या घोळामुळे उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा राहिला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगत कळमकर यांच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगर शहर मतदार संघात आता दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
शिवसेनेचा पारंपारीक बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याकडे पाहिले जात होते. साखर सम्राटांना शह देत येथे शिवसेना वाढली आणि रुजली असताना सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून थेट साखर सम्राटालाच उमेदवारी विकल्याचा आरोप होत आहे. श्रीगोंद्यात शिवसेनेचे युनीट फारसे ताकदवान नाही. पारनेर आणि नगर शहरात शिवसेनेची मोठी ताकद असताना येथे उमेदवारीचा दावा देखील शिवसेना नेत्यांनी केला नाही. उलटपक्षी श्रीगोंद्यात दोन मिनिटात उमेदवार जाहीर केला गेला. त्यातून नगर शहरासह पारनेरमधील शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे. हीच नाराजी आता श्रीगोंदा, पारनेर आणि नगर शहरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असलेल्या या तीनही उमेदवारांच्या पाठीशी कोण्या बड्या अदृष्य शक्तीचा हात मिळाल्यास हे तीनही अपक्ष उमेदवार निवडून येण्याच्या स्पर्धेत येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत महायुती अथवा महाविकास आघाडी या दोघांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच अर्थ अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील संदेश कार्ले यांचा प्रेशर कुकर, राहुल जगताप यांचा रोडरोलर, चंद्रशेखर घुले यांची किटली भाव खाणार असल्याचे पहिल्या टप्प्यात तरी समोर आले आहे.
नेवाशात उमेदवारी आहे मुरकुटे- लंघेंची; चर्चा झडतेय यशवंतरावांच्या उपकाराची!
नेवासा मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात महायुतीच्या नेत्यांकडे उमेदवारी मागणारे विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे हे दोघेही आमने-सामने आलेत. विठ्ठलराव लंघे- बाळासाहेब मुरकुटे या दोघांच्या उमेदवारीपेक्षा आज या मतदारसंघात चर्चा झडतेय ती या दोघांनाही ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केलेल्या मदतीची! लंघे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्यानंतर चौथा मुलगा म्हणून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी संपूर्ण जिल्हाभर लंघे यांना ताकद आणि रसद पुरविण्याचे काम केले. पुढे अध्यक्षपदाचा कालावधी संपताच त्यांनी गडाखांच्या पाठीत खंजीर खुपसला! त्याचवेळी बाळासाहेब मुरकुटे यांना ताकद देण्याचे काम यशवंतराव गडाख यांनी केले. मात्र, संधी मिळताच मुरकुटे यांनीही गडाख यांच्या विरोधात भूमिका घेतली. यावेळी दोघांनीही सोबत जाऊन दोघांपैकी एकाला महायुतीच्या नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली. शिंदे सेनेकडे जागा असल्याने त्यांच्याकडून विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर होताच बाळासाहेब मुरकुटे यांनी बंड केले. खुर्चीसाठी वाट्टेल ते हीच या दोघांचीही भूमिका असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एकूणच या मतदारसंघात सध्या चर्चा झडतेय ती ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे यांना केलेल्या मदतीची, उपकाराची!
कर्जत- जामखेडमध्ये रोहीत पवार यांची शिकार होणार!
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन दुष्काळी समजल्या जाणार्या कर्जत- जामखेड मतदारसंघात रोहीत पवार यांचे पाच वर्षापूर्वी राजकीय आगमन झाले. रोहीत पवार यांच्यामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेल अशी या मतदारसंघातील जनतेची मोठी अपेक्षा होती. मात्र, जनतेची घोर निराशा झाली. मुंबई- दिल्लीतील दरबारी राजकारणात थेट राज्याचा नेता होण्याच्या नादात रोहीत पवार यांचे विमान भरकटले. मतदारसंघातील जनतेचा आणि त्यांचा संपर्क तुटला. शंभर- दोनशे पीए मंडळींची फौज मतदारसंघात राबत असली तरी त्यांच्याकडून अनेकांना अपमानाच सहन करावा लागला आहे. राम शिंदे यांनी अत्यंत चतुराईने स्थानिक भुमिपुत्र आणि गरीबाघरचं पोरगं म्हणून वातावरण तयार केले. सत्तेच्या माध्यमातून अनेक विषय मार्गी लावली आणि आज तेच राम शिंदे हे गावागावातील जनतेच्या गळ्यातील ताईत झाल्याचे दिसते. रोहीत पवार यांचा मतदारसंघात सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याचे आज तरी दिसून येत आहे.