अहमदनगर। नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गावठी कट्टे व 3 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ६१ हजार पाचशे रुपयांचाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी किशोर तुकाराम माळी (वय 30, रा. लोहारवाडी, ता. नेवासा ), कृष्णा येलप्पा फुलमाळी ( वय 33, रा. घोडेगांव, ता. नेवासा ) यांना ताब्यात घेतले असून आकाश अनिल फुलमाळी ( रा. घोडेगांव, ता. नेवासा ) फरार झाला आहे.
आरोपी कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व किशोर तुकाराम माळी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नेवासा, सोनई, शनि-शिंगणापुर, पुणे, जिल्ह्यातील खडकी ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आगामी लोकसभेच्या अनुषगाणे जिल्ह्यात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व किशोर तुकाराम माळीगावठी कट्टे विक्री करण्याचे उद्देशाने घोडेगांव ते लोहगांव रोडवर, घोडेश्वरी शाळेच्या पाठीमागे येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.