अहमदनगर। नगर सहयाद्री-
सराईत गुन्हेगाराच्या टोळीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव (वय २३ रा. मकासरे चाळ, कायनेटीक चौक, नगर) आणि त्याचे साथीदार कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रनशुर (बय १९), कुंदन सुंदर ऊर्फ लक्ष्मण कांबळे (वय २५, दोघे रा.समाजमंदिराजवळ, वाकोडी ता. नगर) यांना करण्यात आली असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबूली दिली आहे.
अधिक माहिती अशी: कांता सुभाष पुरी (रा. नवलेनगर, गुलमोहोर रस्ता, सावेडी) या २ मे रोजी नबलेनगर चौकातून हनुमान मंदिराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कांता यांनाधक्काबुक्की करून व खाली पाडून गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सावेडी उपनगरात वारंवार होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यानुसार पथकाने नगर शहरामध्ये झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. असता एकाची ओळख पटविण्यात यश आले.
त्याची माहिती काढत असताना असे समोर आले की, तो व्यक्ती त्याच्या साथीदारासह वाकोडी फाटा ते वाकोडी जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याजवळ थांबलेला आहे. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तिघांना ताब्यात घेतले.बिरजा राजू जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये दरोडा, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, दुखापत करणे असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
तसेच कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे याच्याविरुध्द यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान अटकेतील तिघांकडे पोलिसांनी दागिन्यांबाबत विचारणा केली असता बिरजा जाधव याने चोरी केलेले दागिने त्याच्या नातेवाईकाकडे ठेवले असल्याचे सांगितले. त्याच्या नातेवाईकांकडून एक लाख ८९ हजारांचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.