श्रीगोंदा । नगर सहयाद्री
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सदगुरू संत शेख महंमद महाराज समाधी मंदिराच्या जिर्णोद्धार कामात झालेल्या अडथळ्यांवर तोडगा काढण्यासाठी १३ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती समाधी मंदिर निर्माण कृती समितीचे निमंत्रक घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
श्रीगोंदा येथील समाधी स्थळाची नोंद १९५३ साली ‘श्री शेख महंमद बुवा देवस्थान, श्रीगोंदा’ या नावाने धर्मदाय आयुक्त कार्यालय, अहिल्यानगर येथे झाली होती. मात्र, १९९७ मध्ये अमीन शेख यांनी ट्रस्टचे नाव व हेतू बदलून ‘शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट’ असे नामकरण केले. त्यानंतर कोणतीही शासकीय परवानगी न घेता या ट्रस्टची नोंदणी महाराष्ट्र वक्फ बोर्डात करण्यात आली. वक्फ बोर्डात केवळ मस्जिद व दर्ग्यांचीच नोंद असल्याने, समाधीच्या जिर्णोद्धार कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य मोर्चा, नंतर २८ एप्रिलपर्यंत धरणे आंदोलन, तसेच २४ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
श्रीगोंदा शहरातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनास दोन दिवसांचा पूर्ण बंद पाळून पाठिंबा दिला होता. सततच्या मागण्यांनंतर शासनाने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी घनःशाम शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, भगवानराव पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, व जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांचा समावेश होता. या चर्चेनंतर उपमुखमंत्री अजित पवार यांनी १३ ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. या बैठक मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यासाठी निर्णायक ठरेल व अडथळ्यांवर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास घनःशाम शेलार यांनी व्यक्त केला.