अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
सर्जेपुरा येथील शेरकर गल्लीतील एका घरात विक्री करण्याच्या उद्देशाने नायलॉन मांजा ठेवला असल्याची माहिती डायल 112 नंबरवर फोन करून आल्याने तोफखाना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. मांजा विक्री करणारा संशयित प्रशांत ऊर्फ प्रसाद योगेश भागवत (वय 23 रा. शेरकर गल्ली, हनुमान मंदिरासमोर, सर्जेपुरा) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 13 हजार रूपयांच्या 26 नायलॉन मांज्याच्या रिळ जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अंमलदार रंगनाथ ताके यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार ताके, शफी शेख यांना डायल 112 या प्रणालीवर बुधवारी (11 डिसेंबर) ड्यूटी होती. ते ड्यूटीवर असताना चार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून, सर्जेपुरा परिसरात शेरकर गल्ली येथील हनुमान मंदिरासमोर राहत असलेला प्रशांत ऊर्फ प्रसाद योगेश भागवत याच्या घरात विक्रीसाठी नायलॉन मांजा ठेवला आहे, अशी माहिती मिळाली. सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना सांगितली.
त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश पाटील व अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पंचासमक्ष सायंकाळी 6:35 वाजण्याच्या सुमारास भागवत याच्या घरी छापा टाकला असता तो मांज्याची रिळ घेऊन बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.