हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर
मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव आमदार!
कट्टर हिंदुत्व व जातीय ध्रुवीकरणाच्या मुकाबल्यात नगरी आखाड्यातील ‘संग्रामी डाव’| नगर शहराच्या जोडीने थेट सिद्धटेकमध्ये भिडले!
सारिपाट / शिवाजी शिर्के:-
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर शहरातील मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीसोबत राहणे पसंत केले. नगर शहरातील मुुस्लिम बहुल भागात नीलेश लंके यांना लोकसभेत आणि अभिषेक कळमकर यांना विधानसभेत त्यांचे कोणतेही ठोस, भरीव काम नसताना गठ्ठा मतदान मिळाले. विधानसभा निवडणुकीत हे मतदार आपल्यासोबत राहतील असा अंदाज स्वत: संग्राम जगताप यांना होता. त्याचे कारणही तसेच होते. नगर शहरातील मुस्लिम बांधवांना अरुण जगताप, संग्राम जगताप यांच्याकडून सातत्याने मदत केली जाते आणि त्यांच्याच पाठबळावर हा समाज नगरमध्ये मोठा झाला असा प्रचार याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात तसे झाले नाही.
संग्राम जगताप यांच्या पाठबळावर नगरसेवक राहिलेल्यांच्या प्रभागात जगताप यांना दोन आकडी देखील मते मिळाली नाही. याउलट कळमकर यांचे काहीच योगदान नसताना त्यांना तीन- चार आकड्यातील मते मिळाली. मुस्लिमधार्जिणे असा जगताप यांच्यावर शिक्का असतानाही या समाजाने त्यांच्याकडे पाठ फिरवणे सर्वांनाच अनपेक्षीत होते. निकाल जगताप यांच्या बाजूने आल्यानंतर दुसऱ्या क्षणापासून जगताप यांनी कडव्या हिंदुत्वाचा चालू केलेला पुरस्कार, हिंदुत्वाचा पुरस्कार करताना मुस्लिमांच्या विरोधात ते घेत असलेली भूमिका बरेच काही सांगून जात आहे. उद्याच्या राजकारणात आणि निवडणुकांमध्ये मुुस्लिम मतदारांना गृहीत धरणे आता त्यांनी जवळपास सोडून दिल्यात जमा आहे.
संग्राम जगताप यांनी आता कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करताना कट्टर हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याचे काम हाती घेतलेले दिसते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन दिवसांपूव कर्जत तालुका गाठला आणि त्यांनी सिद्धटेक येथे हिंदु धमयांच्या भावनांच्या आड येणारा अनधिकृत दर्गा हटविला. नगर शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दर्ग्यांबाबत त्यांनी आता टोकाची भूमिका घेतल्याचे दिसते. कधीकाळी या साऱ्यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात रान उठविणारे अनिल राठोड यानिमित्ताने नगरकरांना आठवले. आ. जगताप हे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेेले दिसत असताना कथीत हिंदू संघटना आणि त्यांचे कथीत नेते ब्र शब्द बोलताना दिसत नाहीत हे विशेष!
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना प्रचारामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे आला. यानंतर मुस्लिम मतांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला होईल आणि हिंदू एकटवतील असा व्यक्त केलेला अंदाज निकालानंतर खरा ठरला. लोकसभा निवडणुकीच्या उलटा निकाल लागण्यात लाडक्या बहिणींच्या जोडीने एकवटलेला हिंदू मतदार हा घटक निर्णायक ठरला हे समजून घेण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण निकाल फिरवू शकतो आणि आम्ही ठरवू तोच उमेदवार निवडून येऊ शकतो अशी भावना मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झाली होती. समाजातील काही नेत्यांच्या बॉडी लॅगवेज देखील यानंतर बदलली होती.
त्यातूनच विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांना साद घातली गेली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या चार महिन्यात मुस्लिम नेत्यांची बदललेली भाषा आणि त्यांची बदललेली बॉडी लँगवेज हिंदू मतदारांनी ओळखली. त्यातून हिंदू खतरेमे असल्याचा मेसेस गेला आणि हिंदू समाज आपोआप संघटीत झाला. ज्यांना चुचकारले त्यांनी त्यांचा बुरख्याआडचा फसवा चेहरा दाखवल्याचे हेरल्यानंतर संग्राम जगताप यांनी आता भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर तडजोड न करण्याची घेतलेली भूमिका त्याचाच परिपाक असू शकते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन एका भाषणादरम्यान जो नारा दिला त्यावरून वादविवाद झाले. लोकसभा निवडणुकीचे अवलोकन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्याविरुद्ध व्होट जिहाद झाला.
त्याचवेळी महायुतीतील नेत्यांच्या भाषणांमध्ये आणि त्यांच्या प्रचारामध्ये हिंदू मतांना साद घालण्याचा उद्देश स्पष्टपणे समोर आला. नगरमधील संग्राम जगताप यांनी त्यांच्या कारकिदत केलेल्या कामांचा लेखाजोगा समोर मांडला होता. नगरच्या नवनिर्मितीत काय योगदान दिले हे त्यांनी निवडणुकीच्या आधीच्या सहा महिन्यात हजारदा आणि हजार चौकांमध्ये मांडले. वास्तवात जे काम झाले त्याचे प्रेझेंटेशन त्यांनी दिले. मात्र हे करताना संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा मुद्दा देखील वापरलाच! शहराच्या वैभवात भर घालणारी रस्त्यांसह उड्डाणपूल, अन्य विकास कामे अशी जंत्री असताना हिंदुत्वाचं कार्ड जगताप का खेळत आहेत याचे कोडे अनेकांना पडले होते. मतदानाची आकडेवारी समोर आली त्यावेळी त्याचे उत्तर समोर आले. गृहीत धरला जाणारा मुस्लिम मतदार आपल्या सोबत राहणार नाही आणि याआधीच्या (सत्यजित तांबे) निवडणुकीत देखील या समाजाने दगाफटका दिल्याचा दाखला त्यांच्या यंत्रणेकडून दिला जात होता.
नगर शहराची वाटलचा मेट्रोसिटी होण्याकडे प्रवास करत असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा अन्य अनेक विषय असो, त्यामध्ये नगर शहराने प्रचंड प्रगती केलेली असेल, तर ऐन निवडणुकीच्या काळात हिंदुत्ववादी प्रचार करण्याची गरज का पडते? असा प्रश्न त्यांना खासगीमध्ये महायुतीच्या नेत्यांना विचारला असता ऑफ द रेकॉर्ड माहिती म्हणून त्यांनी सांगितले होते की, विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर जातीय मुद्द्यांवर ध्रुवीकरण झाल्याचा अनुभव आम्हाला मागच्या लोकसभा निवडणुकीत आला. आम्ही कितीही विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला. नगर शहरासह जिल्ह्यात विकास कामे केली असली आणि विकासाचे मुद्दे यावरच भाषणे केली तरी समोरची बाजू जर ‘संविधान खतरे मे है’ अशा तऱ्हेचे फेक नरेटिव्ह पसरवत असेल आणि त्याचा परिणाम मतदानावर होणार असेल तर आम्हाला ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर समाजाचे एकत्रीकरण करणे आवश्यकच आहे.
याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात झालेली विधानसभेची निवडणुकीतील दोन बाजू पाहता एकीकडे ‘जातीय ध्रुवीकरण’ आणि दुसरीकडे ‘हिंदुत्वावर घातलेली साद’ असेच काहीसे झाले. महायुतीकडून सर्व हिंदूंनी एक होऊन हिंदूंच्या हितासाठी मतदान करावे, अशा पद्धतीचे नरेटिव्ह मांडत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हा समाजातील ओबीसी-एससी-एसटी आणि अन्य प्रवर्गातील घटकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे जातीय जनगणना झाली पाहिजे, असा मुद्दा उचलून धरताना दिसला. याचाच अर्थ महाविकास आघाडीचा प्रचार हा पूर्ण जातीय ध्रुवीकरणाच्या दिशेने गेला होता. नगर शहर आणि जिल्हा त्याला अपवाद कसा असेल?
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मुस्लिमबहुल भागातून मुुस्लिम मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या. ग्रामीण भागात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कधीही मतदानासाठी न दिसणारे मुस्लिम मतदार भल्या सकाळीच कोणतीही व्यवस्था नसताना मतदान केंद्रात पाहून अनेकांना धक्का बसला. विधानसभा निवडणुकीतही तेच होत असल्याची जाणिव होताच मतदानाच्या दिवशी हिंदू मतदार स्वत:हून बाहेर पडला आणि मतदान केंद्रात आल्याचेही दिसले. हे सारे करण्यासाठी संग्राम जगताप यांची एक स्वतंत्र यंत्रणा नगर शहरात काम करत होती आणि ही यंत्रणा अनेकांना शेवटपर्यंत प्रत्यक्षात दिसून आली नाही. जगताप यांची ही यंत्रणा फक्त आणि फक्त हिंदू मतदार आणि त्यांचे कुटुंबातील मतदार यांच्यासाठी काम करत होती. अत्यंत सुक्ष्म नियोजन करताना हिंदू मतदार बाहेर कसे पडतील आणि मतदान कसे करतील यासाठी केलेले नियोजन त्यांच्या विजयात कामी आले.
महायुतीतील भाजपा आणि शिंदे सेना यांनी थेटपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला. मात्र, अजित पवार त्यास अपवाद राहिले. हिंदुत्वाच्या मुद्यावर अल्पसंख्यांक समाज आपल्यापासून दूर जातील असे अजित पवार यांना वाटत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षातील संग्राम जगताप हे एकमेव उमेदवार असे ठरले की त्यांनी थेटपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि ते विजयी झाले. एका बाजूला हिंदुत्व आणि दुसऱ्या बाजूला जातीय ध्रुवीकरण अशी विभागणी झाली असताना नगर शहरातील हिंदू नेता म्हणून ओळख निर्माण करण्यात संग्राम जगताप हे यशस्वी झाले हे नक्की! विधानसभा निवडणुकीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून संग्राम जगताप हे हिंदूत्वाचा मुद्दा घेऊन त्याआड येणाऱ्या प्रत्येकाला आडवे करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संग्राम जगताप यांच्या नगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा येतोय! नगर शहराच्या बाहेर कर्जतसारख्या ग्रामीण भागात हिंदु धर्मियांच्या हिताआड येणाऱ्या विषयात थेट आंदोलन करताना तेथील अनधिकृत दर्गा तोडण्यासाठी त्यांनी हातात हातोडा घेतला! नगर शहरातील रस्त्यांवर, चौकात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले चबुतरे आणि दर्गा हटविण्यासाठी महापालिकेला पंधरा दिवसांचा त्यांनी दिलेला अल्टीमेटम, हिंदू हिताच्या आड येणाऱ्यांशी तडजोड न करण्याची त्यांनी घेतलेली भूमिका आणि हिंदू सणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ते घेत असलेला सहभाग बराच काही सांगून जात आहे. त्यातून नगर शहरालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला नव्या दमाचा तरुण, कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा आमदार दिसणार आहे. कालपर्यंत फक्त नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिसणारे संग्राम जगताप यांचे वादळ आता हिंदुत्वाच्या मुद्यावर संपूर्ण जिल्ह्यात धडकताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.