संगमनेर | नगर सह्याद्री –
अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून संगमनेरी’ काका पुतण्याने सुयोग्य सुरावटींनी सजवून सादर केलेले ’राम गीत ’ सातासमुद्रापार पोहोचले आहे. संगमनेरचे सुपुत्र आणि प्रतिभाशाली गीतकार-कवी मुरारी देशपांडे यांच्या लेखणीतून हिंदीत साकारलेले कश्मीर बोले शीश उठाकर बोले कन्याकुमारी, सदियो से थी मनोकामना आज पुरी हुई हमारी असा मुखडा असलेले हेच ते गीत आहे. सोशल मिडीयावरील शेअरिंग च्या झपाट्याने दुबई पासून अमेरिका-इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, कानडा, स्वित्झर्लंड सह दक्षिण आफ्रिकेतील भागांमध्येही संगमनेरी’ स्वर घुमतोय. संगमनेरचा नावलौकिक वाढविणार्या या कामगिरीबद्दल येथील अनेक कला रसिकांनी मुरारी देशपांडे व सर्वेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.
.
हे रामगीत’ मुरारी देशपांडे यांनी लिहिले आणि त्याला चाल ही लावली. पुतण्या आणि भास्कर संगीत विद्यालयाचा संचालक उदयोन्मुख संगीत संयोजक गायक सर्वेश देशपांडेच्या साथीने या गाण्याचे रेकॉर्डिंग २१ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यानंतर या गाण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. हिंदीमध्ये केवळ एका गीताच्या माध्यमातून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनापासून प्राणप्रतिष्ठेपर्यंतचे सर्व धगधगते प्रसंग या गीतातून समर्थपणे व्यक्त करण्यात गीतकार यशस्वी झाले. गीताला संगीताचा साज चढविल्यामुळे हे गाणे सर्वांच्या ओठात सहजपणाने रुळले.
२१ जानेवारीला रात्री हे गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून वार्याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरले. अयोध्ये मध्ये पोहोचलेल्या महाराष्ट्रातील तसेच नगर जिल्ह्यातील आणि संगमनेर मधील रामभक्तांच्या हजारो मोबाईल मध्ये एकाच वेळी हे गाणे वाजू लागले. बघता बघता या गाण्याने देशाच्या ही सीमा पार केल्या. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अमेरिका दुबई कॅनडा श्रीलंका अशा अनेक देशातील रामभक्तांच्या मोबाईल मध्ये या सुंदर राम गीताला जागा मिळाली.
नगर जिल्ह्याच्या दृष्टीने आणि संगमनेरच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्यामुळे संगमनेरच्या आणि नगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मुरारी देशपांडे आणि सर्वेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.
५०० वर्षातील देशातील अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर हिंदी गीताच्या माध्यमातून जणूकाही डोळ्यासमोर प्रसंग घडत आहेत अशा जबरदस्त शैलीत चित्र उभे केल्यामुळे सर्वत्र या गाण्याची चर्चा होताना दिसून येत आहे. आज पर्यंत देशपांडे काकापुतण्यांची अनेक गाणी झपाट्याने लाखो व्ह्यू मिळवणारी म्हणून सोशल मीडियावर ओळखली जातात. अयोध्येतील ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने मुरारी देशपांडे यांनी पहिल्यांदाच गीतकार म्हणून हिंदी भाषेतील गीत लिहिले आणि तेही रामभक्तांनी डोयावर घेतले. याबाबत देशपांडे यांची भावना विचारली असता ही सर्व बुद्धी देणारा ही प्रभू श्रीरामच आहे आणि हे सर्व यश प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करून मी कृतज्ञता व्यक्त करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.