संगमनेर । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, गुरुवारी आणखी एका धक्कादायक घटनेची नोंद झाली. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अमोल खताळ यांच्यावर खांडगाव येथे एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली. यानंतर संगमनेरमध्ये राजकीय घडामोडींना अधिकच गती मिळाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली, तसेच महायुतीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना आमदार विठ्ठल लंघे, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तसेच संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, अहिल्यानगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या लोकांना ठोकून काढा, अशी भाषा वापरणारी त्यांच्या कार्यकर्त्यांची, सरपंचाची टेप आपल्याकडे आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री विखे पाटील यांनी यावेळी केला.
आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी कोणाच्या संपर्कात होता, कोणाचे काॅल होते. काय मेसेज होते, याची सर्व चौकशी होईल. आता ही ठोकशाहीची भाषा, आता हे एवढे वैफल्यग्रस्त झाले आहे की, एवढं वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही. 40वर्षे तालुक्यातील जनतेच्या जीवावर सत्ता भोगली आहे. आता तुम्हाला जनतेने नाकारलं आहे. आता नवीन माणसाला संधी मिळाली आहे, हे त्यांनी मान्य केले पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे गुरूवारी (ता.28) संगमनेरला एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्याशी एका व्यक्तीने हल्ला चढवला. हात मिळवण्याच्या बहाण्यानं हा हल्ला केला. आमदार खताळ यांनी कानावर बुक्की मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. गुंजाळ नावाची ही व्यक्ती असल्याचे आमदार खताळ यांनी म्हटले आहे. संगमनेरमध्ये झालेले राजकीय परिवर्तन हे काहींना रुचलेले नाही. त्यातूनच हा माझ्यावर हल्ला झाल्याची प्रतिक्रियाही आमदार खताळ यांनी दिली.