अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ऐन उन्हाळ्यात नगर तालुक्यातील दशमी गव्हाण, मदडगाव, सांडवा, भोयरे पठार या गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. संबंधित गावांमध्ये जीलजीवन योजनेचे काम झाले आहे परंतु त्या योजना कार्यान्वीत झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. योजनेचे काम पूर्ण होवूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने जिल्हा परिषदचे सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 1 एप्रिल पासून जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने चारही गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
यंदा जिल्ह्यासह नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. परंतु मार्च महिन्यातच नगर तालुक्यातील काही गावांत पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील दशमी गव्हाण, सांडवा, भोयरे पठार, बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायण डोह, मदडगाव, बालेवाडी, हिवरे झरे आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या- वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यातील दशमी गव्हाण, मदडगाव, सांडवा, भोयरे पठार या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.
या योजनेतून नागरिकांना पाणी मिळावे अशी मागणी कार्ले यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच तात्काळ तात्काळ पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कार्ले यांच्या आंदोलनाची जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाने तातडेीने दखल घेतली आहे. दशमी गव्हाण, सांडवा या गावांच्या योजनेसाठी भातोडी तलावात एकत्रित विहीर केलेली असून पंपिंग मशिनरी बसवलेली आहे. परंतु विद्युत पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा सुरु करण्यास विलंब होत असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.
सदर ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यासंबंधित डिपी बसविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर 1 एप्रिलपासून संबंधित गावांना जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी कार्ले यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे कार्ले यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे दशमीगव्हाण, मदडगाव, सांडवा, भोयरे पठारमधील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.