पारनेर ।नगर सहयाद्री:-
पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे यांची, तर उपाध्यक्षपदी कल्याण काळे यांची निवड झाली आहे. गुरुवारी (29 ऑगस्ट) सुपा येथील दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर झाली.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 15 पैकी 12 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. या यशानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सुजय विखे, आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप ठुबे आणि उपाध्यक्ष कल्याण काळे यांचे माजी खासदार सुजय विखे पाटील मित्र मंडळ, आ. काशिनाथ दाते आणि राहुल शिंदे मित्र मंडळाने अभिनंदन केले आहे.
दूध संघाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच राहुल पाटील शिंदे यांनी सांगितले. या निवडीमुळे पारनेरच्या सहकार क्षेत्रात नवे वळण येण्याची अपेक्षा आहे.