पोलीस अधीक्षक राकेश ओला आले ॲक्शन मोडवर | अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली सुपा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी
शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
जादा परताव्याच्या अमिषाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या संदीप थोरात व त्याच्या टोळीचा क्लासीक ब्रीज या कंपनीतील घोटाळा बाहेर आला असतानाच आता त्या कंपनीच्या नंतर त्याने मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली होती. याच मनीमॅक्स कंपनीच्या सुपार (पारनेर) येथील कार्यालयातून त्याने पारनेर, सुपा, शिरुर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना गंडवले. त्यात काही उद्योजक जसे आहेत तसेच काही पत्रकार देखील! क्लासीकब्रीजमधील गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप थोरात याला बेड्या ठोकल्याचे समजताच सुपा येथील गुंतवणूकदारांनी थेट पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. त्यांच्या तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सुपा पोलिसांना संदीप थोरात व त्याच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली.
शेवगावच्या घोटाळ्यातील कस्टडीत असणारा संदीप थोरात आता पारनेरच्या कस्टडीची हवा खाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुपा (पारनेर) येथील गुंतणूकदारांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी संदीप थोरात याच्यासह त्याच्या घोटाळेबाज सहकाऱ्यांची यादी, केलेली गुंतवणूक आणि झालेली फसवणूक याचे आकडेच पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात सादर केले. दरम्यान याच कालावधीत क्लासीकब्रीजच्या गुंतवणूकदारांनीही अर्ज केले. त्यांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि संदीप थोरात याला बेड्या ठोकण्यात आल्या. संदीप थोरात याच्या घोटाळ्यांची माहिती आणि अर्ज मोठ्या प्रमाणात समोर आल्याने अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सुपा येथील गुंतवणूकदारांच्या तक्रारीची शहानीशा करत संदीप थोरात व त्याच्या घोटाळेबाज टीमवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना आदेश प्राप्त झाले तक्रार अर्जानुसार 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे.
शटरला चिकटवलेले ‘ते’ पत्र निघाले जीएसटीचा नंबर रद्द केल्याचे!
शेवगावमधील शेकडो गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये परत देऊ शकत नसल्याने संदीप थोरात याने हुशारी केली. त्याने बनावट टीम तयार केली आणि त्या टीमला चार चाकी वाहन दिले. त्या वाहनातून संदीप थोरातच्याच गँगमधील चार- पाण गेले. शेवगाव कार्यालयात त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास प्रवेश केला आणि जीएसटीचे अधिकारी असल्याची बतावणी केली. साधारणपणे तासभर तपासणी चालू असल्याचे नाटक करून हे पथक कार्यालयातून बाहेर पडले आणि त्यांनी कार्यालयाचे शटर खाली घेतले. शटर बंद करताच या भामट्यांनी त्या शटरवर जीएसटी कार्यालयाचे नोटीस चिटकवली आणि समोर उपस्थित गुंतवणूकदारांना ही नोटीस जीएसटी कार्यालयाची असून आम्ही कार्यालय सील केले असल्याचे सांगितले. यानंतर हे भामटे नगरच्या दिशेने निघून आले. दरम्यान, शटरवर चिटकवण्यात आलेले पत्र आमच्या हाती आले असता आम्ही त्या पत्राची खातरजमा करण्यासाठी जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. संदीप थोरात याने क्लासीक ब्रीज या कंपनीसाठी जीएसटी नंबर घेतला होता. तो जीएसटी नंबर रद्द करण्यासाठी त्याने त्या कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जीएसटी कार्यालयाने उलटटपाली, ‘क्लासीकब्रीज कंपनीच्या विनंतीनुसार तुमचा जीएसटी क्रमांक आम्ही रद्द करत असून तसे अप्रुव्हल आम्ही देत आहोत’, असे कळविणारे पत्र पाठवले होते. संदीप थोरात व त्याच्या टोळीतील भामट्यांनी हेच पत्र क्लासीकब्रीज कंपनीचे शेवगाव कार्यालया सील करणारे असल्याचे भासवले आणि त्या कार्यालयातील सर्व कागदपत्रे पळवून आणली.
सह्याद्री मल्टीिनिधीत कोट्यवधींना गंडा; श्रीगोंद्यातून आला अर्ज
संदीप थोरात याने गंडविणाऱ्या कंपन्यांची एक फॅक्टरीच चालू केली होती. त्याच्या या फॅक्टरीतील पहिली कंपनी होती ती सह्याद्री मल्टीनिधी प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून त्याने नगर शहरासह नगर तालुक्यातील अनेकांना गंडविले. ईश्वर मचे हा या मल्टीनिधी कंपनीचा सीईओ म्हणून काम पहात होता. श्रीगोंदा शहरात त्यानेन सह्याद्री मल्टीनिधीची शाखा काढताना ती पतसंस्था असल्याचे भासवले. त्यानुसार राजकुमार गोरे यांनी त्यांच्याकडील पाच लाख रुपये 2021 मध्ये येथे गुंतवले. त्यानंतर त्यांनी परताव्यासाठी अनेकदा हेलपाटे मारले. मात्र, त्यांना संदीप थोरात याने दाद दिली नाही. दरम्यान, गोरे यांचे 2023 मध्ये निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर हे कुटुंब आर्थिक अडचणीत आले. यानंतर त्यांची मुलगी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना तीने अनेकदा या रकमेसाठी पाठपुरावा केला. मात्र, त्यांना रक्कम भेटली नाही. त्यामुळे गोरे कुटुंबांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले असून श्रीगोंदा पोलिसात धाव घेत अर्ज दाखल केला आहे.
पुण्याकडे पळून जात असताना सुपा टोल नाक्यावर पकडले!
हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार संदीप थोरात हा त्याच्यावर गुन्हा दाखल होताच पुण्याच्या दिशेने निघाला होता. चार चाकी वाहनातून त्याने एक साथीदार सोबत घेत प्रवास सुरू केला. दरम्यान, संदीप थोरात याच्या मागावर पोलिस होतेच! त्यांनी थोरात याचे लोकेशन ट्रेस केले असता तो पुण्याकडे निघाल्याची माहिती समोर आली. यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरली. सुपा पोलिसांना संदीप थोरातबाबत माहिती देण्यात आली आणि टोल नाक्यावर बंदोबस्त लावण्यात आला. चार चाकी वाहनातून संदीप थोरात टोल नाक्यावर येताच सुपा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या टीमने थोरात याला ताब्यात घेतले.
संदीप थोरात अन् टोळीविरोधात एमपीआयडी!
जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांना ठगविणाऱ्या संदीप थोरात आणि त्याच्या टोळी विरोधात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी संदीप थोरात याच्या टोळीचे कारनामे पाहून शेवगाव पोलिसांना कठोरात कठोर कलमे लावत थोरात आणि टोळीच्या विरोधात मोहीम हाती घेतली असल्याचे समोर येत आहे. याशिवाय थोरात व कोरडे या दोघांना अटक होताच या टोळीतील फरार झालेल्या सदस्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तपासी अधिकारी समाधान नांगरे यांनी दिली.